|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » डॉक्टर कामावर रुजू होणार ?

डॉक्टर कामावर रुजू होणार ? 

प्रतिनिधी / मुंबई

राज्यभरातील 4500 निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या रजा आंदोलनातून काही निवासी डॉक्टर कामावर रुजू होण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत होते; तर काही संप सुरुच राहणार असल्याचे सांगत होते. यात राज्य सरकारी रुग्णालयातील  निवासी डॉक्टर कामावर रुजू होणार असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून सांगण्यात आले, तर पालिका रुग्णालयातील डॉक्टर सेवेत रुजू होणार की नाही, याबाबत रात्री उशिरापर्यंत समजले नाही. मात्र राज्यभरातील महत्त्वाच्या डॉक्टरांच्या संघटनांनी निवासी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यावरून हा गेंधळ अधिक वाढला. रात्री आठनंतरच्या मार्डच्या बैठकीनंतर आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. तर सेवेत रुजू न होणाऱया डॉक्टरांविरोधात मेस्मांतर्गत कारवाई होण्याची शक्यताही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवली. मात्र या सर्व गोंधळाचा दुष्परिणाम रुग्णसेवेवर तिसऱया दिवशीही सुरू होता.

सकाळी 11 वाजेपर्यंत निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. उच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोवर कामावर रुजू होणार नसल्याच्या भूमिकेवर डॉक्टर कायम होते. दुपारनंतर निवासी डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनाकडून नोटीसा बजावल्याच्या वृत्तांनी डॉक्टरांनी कामावर रुजू होण्यास सहमती दर्शवली असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान यात अंशतः डॉक्टर सहभागी होतील असे मध्यवर्ती मार्डकडून सांगण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या ‘रात्री आठ वाजेपर्यंत सेवेत रुजू व्हा, अन्यथा सहा महिन्याचा पगार गमवावा लागेल’, या सूचनेने प्रचंड गोंधळ उडाला.

इंडियन मेडिकल असोसिएशन, राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, पॅथलॉजिस्ट संघटना, म्युनिसिपल टीचर्स असोसिएशन संघटना सारख्या संघटनांनी निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखाने बंद राहतील असे सांगण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांच्या कामावर रुजू होण्याच्या गेंधळामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली होती.