|Monday, September 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भक्ति केली ख्यात ज्ञानदेवे

भक्ति केली ख्यात ज्ञानदेवे 

ज्ञानेश्वर माउलींनी दाखवून दिलेल्या नाम भक्तीच्या मार्गावरून स्त्री, शुद्रादी बहुजन चालू लागले. नामस्मरणाने आपल्या सर्व पापाचा नाश होतो या श्रद्धेमुळे त्यांच्या मनाला मोठाच दिलासा मिळाला. त्यांनी गमावलेला आत्मविश्वास जागा झाला. त्यांचे आत्मभान जागे झाले. पुरोहितांचे प्रायश्चित्ताचे व्यवसाय बंद पडले. पाप नाहीसे झाले. दु:ख दूर झाले. स्त्री शुद्रादी बहुजनातील अनेक जण काव्य करू लागले. एव्हढेच नव्हे तर नाम भक्तीच्या मार्गावरून वाटचाल करत ते संत पदाला पोहोचले. ज्ञानदेवादी भावंडांबरोबर एकाच वेळी महाराष्ट्रात नामदेव शिंपी, चोखोबा महार, गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार असे बहुजन जातीत संत निर्माण झाले. याखेरीज मुक्ताबाई, जनाबाई, सोयरा, निर्मळा, कान्होपात्रा अशा कवयित्री संत याचवेळी निर्माण झाल्या. हे सर्वजण नामघोष करू लागले. याचे शब्द चित्रच ज्ञानेश्वर माउली रेखाटतात ते असे –

तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।। जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ।।

यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं।। यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ।।

यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।।

तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ।।

ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दु:खें ।

अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ।।

ज्ञानेश्वर माउलींच्या प्रेरणेने समाज मनात झालेली ही मोठीच क्रांती होती. त्यामुळे सर्व संतांनी ज्ञानोबांना माउली मानले. त्यांचे ऋण मान्य केले आणि त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. ज्ञानेश्वर माउलींनी केलेल्या या क्रांती कार्याचे यथार्थ वर्णन करताना नामदेवराय म्हणतात

नामा म्हणे येणे तारीले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवे ।। संत जनाबाई ज्ञानेश्वर माउलीविषयी म्हणतात – ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ।।

मरोनियां जावें । बा माझ्याच्या पोटा यावें ।।

ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ।।

जावें वोवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ।। आणखी एका अभंगात जनाबाई लडिवाळपणें म्हणते –

अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें ।। ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं । धांवोनियां येई दूडदुडां ।। बहु कासाविस होतो  माझा जीव ।कनवाळय़ाची कींव येऊं द्यावी ।। नामयाची जनी म्हणावी आपुली । पायीं सांभाळिली मायमापें ।।

संत सेना न्हावी ज्ञानेश्वर माउलींबद्दल म्हणतात-

नाम हें अमृत भक्तासी दिधलें । ठेवणें ठेविलें होतें गुप्त।। प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी । मार्ग तो निर्धारी दाखविला ।। चोखोबांनी देखील ज्ञानेश्वर माउली व ज्ञानेश्वरीबद्दल काय म्हटले आहे पहा –

सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलंकाभुवनी नांदत असे ।। तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली

जेणें निगमावली प्रगट केली ।। संसारी आसक्त माया-मोह रत। ऐसे जे पतीत तारावया ।। चोखा म्हणे तेच ज्ञानदेवी ग्रंथ

वाचिता सनाथ जीव होती