|Friday, November 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हे हात रोखा

हे हात रोखा 

सध्या समाजात मारहाणींची साथ आलेली दिसते. महाराष्ट्राच्या विधानसभेतील शाब्दिक मारामारी वेगळी. परस्परांना शब्दांचा मार देण्याची तिथली चढाओढ नित्याचीच आहे. परंतु इतरत्र प्रकरणे ज्या रीतीने हातघाईवर येत आहेत ते चिंताजनक आहे. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी बिझनेस क्लासमधून प्रवास करता आला नाही याचा राग काढताना गुरुवारी एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला मारहाण केली. इतकेच नव्हे तर नंतर तिचे समर्थनही केले.  खासदार असल्याने आपल्याला सर्व गुन्हे माफ असल्याचा त्यांचा समज झालेला दिसतो. त्याच दरम्यान संसदेच्या आवारात नाशिकच्या एका खासदारासोबत गेलेल्या कार्यकर्त्याने एमआयएमच्या खासदाराला मारहाण केल्याचा व त्याचे समर्थन केल्याची बातमी आली. हे चालू असतानाच महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयामधील निवासी
डॉक्टर्सचा संप चालू होता. डॉक्टर्सना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने हे
डॉक्टर्स सामूहिक रजेवर गेले. आता मार्ड या संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली असली तरी या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नांचा विचार व्हायलाच हवा. साधारण वर्षातून एकदा तरी असा मारहाणीचा प्रकार घडतोच. यावेळी आधी धुळ्यात एका डॉक्टरला मारहाण झाली. त्यावेळी तेथील मेंदूरोगतज्ञ उपलब्ध नव्हता. शिवाय एमआरआय वगैरेंची सोयही नव्हती. यामध्ये सेवेवरच्या निवासी डॉक्टरचा काहीच दोष नव्हता. तरीही रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली. तेथील कात्री त्याच्या डोळ्यात खुपसण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्याचा डोळा कायमचा जायबंदी झाला आहे. यापाठोपाठ मुंबईत सायन इस्पितळात असाच प्रकार घडला. त्यामुळे डॉक्टर्सच्या संतापाचा स्फोट झाला व त्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा व्यवस्था कडेकोट केल्याखेरीज आपण कामावर परतणार नाही असा निर्धार त्यांनी केला. यावेळी कधी नव्हे ते खासगी प्रॅक्टिस करणाऱया डॉक्टर्सनीदेखील या संपाला पाठिंबा दर्शवला. मुंबईसह महाराष्ट्रात बहुतांश डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेवले. शुक्रवारी दिल्लीच्या डॉक्टर्सनीदेखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी हीच कृती केली. याचाच अर्थ डॉक्टर्सच्या सहनशक्तीचा आता अंत झाला आहे. वैद्यकीय व्यवसाय हा एकेकाळी पवित्र मानला जात होता. डॉक्टरवर लोकांची देवासमान श्रद्धा असे. आज त्यात काहीशी खोट आली असली तरी मृत्यूपासून आपल्याला
डॉक्टरच वाचवू शकतात ही लोकांची भावना कमी झालेली नाही. मात्र दिवसेंदिवस ही सेवा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर चालली आहे. डॉक्टर अनावश्यक तपासण्या करायला आणि औषधे घ्यायला लावतात व त्यातून प्रचंड पैसे कमावतात असा समज बळावतो आहे. अपवाद वगळता
डॉक्टरांची वेगाने वाढत जाणारी संपत्ती, त्यांच्या परदेशवाऱया, उभी राहणारी प्रचंड इस्पितळे हे सर्व आपल्या पैशांवर आहे ही लोकांची भावना दृढ होत चालली आहे. आजही ज्यांची सामाजिक जाणीव जागृत आहे असे काही डॉक्टरच जागल्याच्या भूमिकेतून हे आरोप खरे असल्याचे सांगत आहेत. मात्र सर्वच खासगी डॉक्टर्स असे  नसतात. शिवाय काहीही असले तरी त्यांना मारहाण करणे हे कोणत्याही स्थितीत समर्थनीय होऊ शकत नाही. सरकारी रुग्णालयात काम करणाऱया निवासी डॉक्टर्सच्या अडचणी आणखीनच वेगळ्या आहेत. त्यांना प्रचंड काम करावे लागते. कित्येकदा सलग 30-32 तासही रुग्णालयात घालवावे लागतात. त्या मानाने त्यांचे वेतन फार कमी असते. सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या क्षमतेपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते व सुविधांची बोंब असते. दोनच महिन्यांपूर्वी मुंबईतील पालिका व सरकारी रुग्णालयांच्या ओपीडींमधील अवस्था काय आहे याबाबत आम्ही एक प्रदीर्घ वृत्तांत मालिका प्रसिद्ध केली होती. राजावाडी किंवा सायनसारख्या रुग्णालयांमध्ये तीन ते पाच हजार लोक रोज ओपीडीत येऊ शकतात हे त्यात दिसले होते. केईएममध्ये तर देशभरातून रुग्ण येतात हे सर्वांना ठाऊक आहे. डॉक्टर्स, नर्सेस तसेच रुग्णालयातील यंत्रणा हे चोवीस तास व 365 दिवस कमालीच्या तणावाखाली काम करीत असतात. ही व्यवस्था सुधारायची तर सर्व भागांमध्ये पुरेशा संख्येने रुग्णालये उभारणे, डॉक्टर्स, नर्सेस यांचे पगार वाढवणे, त्यांची संख्या वाढवणे, या रुग्णालयांचे व्यवस्थापन व्यावसायिक रीतीने करणे, आवश्यक यंत्रसामग्री वेळच्या वेळी उपलब्ध करणे इत्यादींची तरतूद करायला हवी. ही सर्व सरकार व पालिकांची जबाबदारी आहे. रुग्णालयातील गर्दी रोखणे यासाठी लोकांच्या प्रबोधनाची मोठी मोहीमच राबवायला हवी. घरोघरी संडास बांधावेत यासाठी सध्या सरकारी जसा जाहिरातींचा मारा करते आहे त्याच धर्तीवर हे करावे लागेल. आपल्याकडे एखादा माणूस आजारी पडला की त्याचे असतील नसतील तेवढे नातेवाईक व मित्र इस्पितळात गर्दी करतात. त्यामुळे गोंधळ वाढतो व संसर्गही होण्याचा धोका बळावतो. हे लोकांना समजावून सांगायला लागेल. अनेकदा रुग्णालयांमध्ये कर्मचारी कमी असल्याने रुग्णांची सफाई किंवा औषधे देण्यावर लक्ष ठेवणे या गोष्टी नातेवाईकांना कराव्या लागतात. त्यामुळे ही गर्दी करण्याची प्रवृत्ती वाढते हे खरे आहे. रुग्णालयांमध्ये अधिक संख्येने सुरक्षा रक्षक तैनात करण्याची संपकरी डॉक्टरांची मागणी आहे. सरकारही त्याच आश्वासनावर भर देत आहे. शिवाय डॉक्टरांना मारहाण करणाऱयांना कडक शिक्षा करण्याच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशीही मागणी जोरात आहे. पण हा मुद्दा केवळ शरीरसंरक्षक वाढवण्याचा नाही हे लक्षात घ्यायला हवे. रुग्णालयांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देणे हेही तितकेच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. डॉक्टरांवर उगारले जाणारे हात रोखण्याचा तोच प्रभावी मार्ग आहे. दरम्यान, डॉक्टरांनीही आपल्या मागण्यांचा मुद्दा किती ताणायचा याचे भान ठेवायला हवे. या संपामुळे एकटय़ा मुंबईत 135 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पालिकेतर्फे देण्यात आली आहे. हे डॉक्टरी शपथेला साजेसे नाही व पुन्हा होता कामा नये.

Related posts: