|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » बदलापुरात रेकॉर्डब्रेक कर वसुली

बदलापुरात रेकॉर्डब्रेक कर वसुली 

नगर परिषदेच्या तिजोरीत आतापर्यंत 20 कोटी जमा

बदलापूर / प्रतिनिधी

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा रेकॉर्डब्रेक करवसुली केली आहे. आतापर्यंत नगर परिषदेच्या तिजोरीत 20 कोटी रुपये जमा झाले असून 21 मार्चला 1 कोटी 10 लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. कर विभागाचे भाऊ निपुर्ते व त्यांच्या सहकाऱयांनी केलेल्या या कामगिरीचे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विशेष कौतुक करण्यात आले.

कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने मार्च 2017 पर्यंत 15 कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. तत्पूर्वीच 20 कोटी रुपयांची कर वसुली झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. या नगर परिषदेने नुकतीच कर पुनर्रचना आणि नव्या मालमत्तांचे सर्वेक्षण केले होते. त्यामुळे यंदा नगर परिषदेचे 24 हजार मालमत्ताधारक वाढले. यंदाच्या  आर्थिक वर्षात सुमारे 96 हजार मालमत्ताधारकांनी कर भरणा केला. त्यात 360 औद्योगिक मालमत्ताधारक आहेत. वाढलेल्या मालमत्ता धारकांमुळे यंदा 24 कोटी 48 लाख रुपयांचा कर भरणा झाला. अर्थात त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषदेच्या कर विभागाने विशेष प्रयत्न केले आहेत. वैयक्तिक मालमत्ता कराची नोटीस देण्यासह गफहसंकुलांच्या सदस्यांकडे यादी देऊन कर भरणा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे 24 मार्चपर्यंत 24 कोटी 48 लाखांपैकी 20 कोटी 36 लाखांची वसुली करण्यात मालमत्ता विभागाला यश आले. यापैकी 2 कोटी 10 लाख रुपयांचा कर भरणा हा औद्योगिक क्षेत्रातून झाला असून 360 मालमत्ताधारकांनी हा भरणा केला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 46 लाखांचा कर भरणा हा जेमिनी टेक्स इंडस्ट्री या कंपनीने केला आहे.

तर रहिवासी क्षेत्रातील 97 हजार मालमत्ता धारकांनी 18 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. दरम्यान, 21 मार्चला नगर परिषदेच्या तिजोरीत तब्ब्ल 1 कोटी 10 लाखांचा विक्रमी भरणा झाला आहे. नगर परिषदेच्या इतिहासातील हा रेकॉर्डब्रेक करभरणा आहे. यापूर्वी कर भरणा 20 कोटींच्या वर गेलेला नव्हता. गेल्या वर्षी ही कर वसुली 11 कोटी 37 लाख होती. सर्वात महत्वाचे म्हणजे अवघ्या दहा कर्मचार्यांच्या बळावर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कर वसुली करून नगर परिषदेचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यात कर विभागाचे प्रमुख भाऊ निपुर्ते व त्यांच्या सहकार्यांना यश आले आहे. येत्या आठवडय़ाभरात आणखी तीन कोटींची कर वसुली होईल असा कर विभागाचा अंदाज आहे.