|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गिलगिट-बाल्टिस्तान भारताचेच भाग !

गिलगिट-बाल्टिस्तान भारताचेच भाग ! 

लंडन, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गिलगिट आणि बाल्टिस्तान या जम्मू-काश्मीरमधील भागावर पाकिस्तानने केलेला कब्जा अवैध असल्याचा दाखला ब्रिटनने दिला आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तान हे दोन्ही भाग भारताचेच असून पाकिस्तानने तेथे केलेला कब्जा अयोग्य असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर झाला असून भारताच्या दाव्यांना यामुळे बळकटी मिळाली आहे.

ब्रिटनच्या संसदेमध्ये संमत करण्यात आलेल्या एका प्रस्तावानुसार काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांवर पाकिस्तानवर करण्यात आलेला कब्जा अवैध आहे. तसेच आपल्या देशातील पाचवा प्रांत म्हणून पाकिस्तानकडून होत असलेली दावेदारीही गैर असल्याचे ब्रिटनने स्पष्ट शब्दात प्रस्तावात म्हटले आहे.  इतकेच नाही तर, “गिलगिट आणि पाकिस्तान हा भारतातील जम्मू-काश्मीरचा कायदेशीर आणि घटनात्मक भाग आहे’’, असेही संसदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. ब्रिटन संसदेत संमत झालेल्या प्रस्तावामुळे भारताच्या अपेक्षा उंचावल्या असून पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली आहे.

पाकिस्तानच्या कृतीचा सभागृहात निषेध

गिलगिट-बाल्टिस्तानसंबंधीचा प्रस्ताव ब्रिटनच्या संसदेमध्ये 23 मार्च रोजी मांडण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावावर सभागृहात बरीच चर्चा झाली. कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लैकमेन यांनी भारताची बाजू उचलून धरत 1947 च्या दरम्यानच पाकिस्तानने या भागावर अवैधरित्या कब्जा केल्याची माहिती सभागृह सदस्यांना दिली. तसेच या भागात राहणाऱया लोकांना मुक्तपणे जगायलाही दिले जात नसून त्यांच्या मुलभूत अधिकारांवरही गदा आणली जाते असेही त्यांनी सांगितले. अशाप्रकारची चर्चा झाल्यानंतर संबंधित प्रस्तावाला सभागृहाने मान्यता दिली आहे. तसेच पाकिस्तानच्या कृतीचा सभागृहाने निषेधही केला आहे. त्याचबरोबर या भागात पाकिस्तान आणि चीनच्या सहकार्याने सुरू असलेले ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ प्रकल्पाचेही कामही गैर असल्याचे  ब्रिटनने स्पष्ट केले आहे.

भारताच्या दावेदारीला अधिकच बळकटी

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांवर पाकिस्तानने बेकायदा कब्जा केला आहे. तो भाग आधी मुक्त करून काश्मीरला त्याच्या मूळ स्वरूपात आणू, अशी रोखठोक भूमिका भारताने नुकतीच जाहीर केली होती.  केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. आता ब्रिटनच्या पाठिंब्यामुळे भारताच्या दावेदारीला आणखीनच बळकटी मिळाली आहे.

काश्मीरची समस्या पाकनेच निर्माण केली आहे. सध्या चीनच्या जीवावर त्यांचे नेते बेताल वक्तव्ये करीत आहेत. पाकने पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान या काश्मीर राज्याच्या भागांवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार माजविणाऱया फुटीरतावाद्यांना पाकनेच गेली अनेक दशके खतपाणी घातले आहे. पाकच्या तावडीतून आम्ही संपूर्ण काश्मीरची मुक्तता करू. हा भाग भारतात समाविष्ट करून काश्मीरला त्याचे मूळ स्वरूप प्राप्त करून देऊ, अशी स्पष्टोक्ती जितेंद्र सिंग यांनी केली होती.