|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सोहिरोबानाथ हे सामाजिक एकतेचे शांतीदूत

सोहिरोबानाथ हे सामाजिक एकतेचे शांतीदूत 

सास्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा

सोहिरोबानाथ आंबिये हे अलौकिक प्रतिभेचे आणि अफाट बुद्धिमता लाभलेले शांतीदूत होते. नाथ सांप्रदायाची वैदिक विचारधारा आचरणात आणून सामाजिक एकता व अखंडता यासाठी अथक काम करणारे ते सिद्धपुरूष होते, असे उद्गार डॉ. धो. दौ. कुंभार यानी गोवा मराठी अकादमीतर्फे आयोजित केलेल्या संत सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनात व्यक्त केले.

माशेल येथील श्री देवकीकृष्ण सभागृहात सुरू असलेल्या ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ या परिसंवादामध्ये अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत वक्ते म्हणून प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, प्रा. पोर्णिमा केरकर तसेच सोहिरोबानाथाचे वंशज प्रा. प्रसाद आंबिये व प्रां चंद्रकांत रामा गावस उपस्थित होते.

व्यवहारामध्ये सोहिरोबानाथाचे मन रमले नाही. कुलकर्णी पदासारख्या मोठय़ा हुद्दय़ावर कार्यरत असून देखील त्यानी आपल्या अधिकाराचा वापर दिनदुबळय़ा समाजासाठी केला. पेडणे येथील पालये गावात गोरक्षनाथांचं मंदिर आहे. त्यामुळे गोरक्षनाथाकडून त्याना अनुग्रह प्राप्त झाला या गोष्टीला दुजोरा मिळतो. गुरू भक्तीवर सोहिरोबानाथांच्या अनेक रचना आहेत. आत्मनंदात निमग्न होणारी इश्वरभक्ती त्यांच्या अभंगामध्ये जाणवते. जीवनाच्या मर्म सांगणाऱया कितीतरी रचना त्यांच्या भक्तीकाव्य संपदेमध्ये सापडतात असेही डॉ. कुभांर म्हणाले.

प्रा. कृष्णाजी कुलकर्णी

इतिहासकार किंवा संशोधक हे भूतकाळाकडे अन्वयार्थाने पहात असतात. सोहिरोबानाथांचा जीवनकाल हा प्रातीय परतंत्र्याचा काळ ज्यावेळी आपली भाषा, आपली संस्कृती, आपला प्रांत पर्यायाने आपले जीवनच संकटात होते. त्यामुळे परकीय सत्तेची धग सोसूनदेखील समाजाला सुख प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणाऱया संतविभूषितपैकी सोहिरोबानाथ हे एक होते असे प्रा. कृष्णाजी कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले.

सोहिरोबानाथांना बाल सुलभ जाणीवा होत्या. ते चिंतनमग्न असायचे त्यामुळे त्यांचे जीवन हे सामन्य माणसाचे नव्हते तर पुर्वजांची त्यांची पुर्वी राहिलेली साधना या जन्मामधील पुर्णत्वाकडे नेण्यासाठीच त्यांचा जन्म होता. मानवाला जगविण्यासाठी पंचभूतांमधील ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यालाच परमेश्वर म्हणतात आणि हा परमेश्वर सोहिरोबानाथांच्या कार्याची प्रेरणा होती. म्हणूनच वैभवशील जीवनावर तुलसीपत्र ठेवून अध्यात्माच्या माध्यमातून त्यांनी जनसेवा अंगीकारली असे प्राचार्य कुलकर्णी पुढे म्हणाले.

जीवनाचे तत्वज्ञान सोहिरोबानाथानी जाणले होते म्हणूनच चमत्काराच्या मिमांसेपेक्षा वास्तव समजून घेणे आणि तत्वज्ञानाच्या चौकशीत राहूनच व्यवहारीकपणाचा त्याग करुन परलौकीकत्वाचा स्वीकार करणे त्यांनी उचित मानले. संत तुकाराम आणि संत सोहिरोबानाथ यांच्यामध्ये अनेक बाबतीत समानसुत्र असल्याचेही प्राचार्य कुलकर्णी पुढे म्हणाले.

प्रा. पौर्णिमा केरकर

संस्कृती ही नदीच्या पात्रासारखी असते जी अव्याहत आणि अखंडीतपणे प्रवाहात असते. ज्या ज्या वेळी कर्मकांडाला उत आला. समाजात अराजकता माजली  त्या त्यावेळी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य संतांनी केले. त्याला सोहिरोबानाथ अपवाद नव्हते असे प्रा. पौर्णिमा केरकर म्हणाल्या.

ज्यावेळी सतीची प्रथा अस्तित्वात होती त्यावेळी आपली बहिण मुक्ता हिला माहेरी आणून तीची सर्वार्थाने देखभाल करण्याचे काम करतानाच तिला साक्षर बनविणाऱया सोहिरोबानाथांची विचारसरणी पुरोगामी होती, क्रांतीकारी होती हे सागंताना स्त्राrयांकडे सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेच्या भावनानेने पाहणारे सोहिरोबानाथ दृष्टे होते तसे ते पुढे म्हणाल्या.

विठ्ठल पंतासारख्या स्त्री लंपटांना अनैतिकतेचे मार्गावरुन अध्यात्माकडे वळविणाऱया सोहिरोबानाथांनी ढोंगीपणा, पाखंडीपणा, आत्मस्तुती, लाचारी याविरोधात  वागून सत्याची कास धरली. त्यांचे काव्य प्रासादीक होते. सुखाची देवाणघेवाण करणारे होते. विवेकाची ओल त्यांच्या ठायी होती. समाजमनात अध्यात्माची बीजे पेरण्याचे महाकाय कार्य त्यांनी केल्याचे प्रा. केरकर शेवटी म्ह्णाल्या.

यावेळी प्रा. चंद्रकांत गावस यांच्या सिद्धयोगी या सोहिरोबानाथांच्या जीवनकार्यावर आधारलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कुंभार यांच्याहस्ते करण्यात आले. प्रा. प्रसाद आंबीये यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी प्रास्ताविक केले, दशरथ परब यांनी स्वागत केले, प्राची जोशी यांनी सुत्रनिवेदन केले. मोहन डिचोलकर यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन वक्त्यांचा सन्मान करण्यात आला.

या सत्राला जोडूनच गोमंतकीय गायक दुर्गाकुमार नावती व परशुराम काणकोणकर यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला. त्यांना तबल्यावर अभिजित एकावडे व हार्मोनियमवर रामदास खांडोळकर यांनी तर मंजिरीवर पुंडलिक काणकोणकर यांनी साथ संगत केली.

Related posts: