|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आधुनिक युगालाही संत साहित्य मार्गदर्शक

आधुनिक युगालाही संत साहित्य मार्गदर्शक 

वार्ताहर/माशेल

समाजातील विषमता व भेदभाव दूर करतानाच, समाज सुधारणेसाठी प्रबोधन व लोकजागरणाचा पहिला पाया संतांनी घातला. समता आणि बंधूभावाची शिकवण अध्यात्म आणि परमात्माच्या माध्यमातून समाजाला दिली. संतांची ही शिकवण आजच्या समाजाला तेवढीच लागू पडते. त्यासाठी संत साहित्य व त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी माशेल येथे भरलेल्या संत सोयरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

माशेल येथील देवकीकृष्ण सभागृहात भरविण्यात आलेल्या या दोन दिवशीय संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वरीचे अभ्यासक प्राचार्य गोपाळराव मयेकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, दै. तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर, नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, कवी पुष्पाग्रज तथा अशोक नाईक, शशांक ठाकूर, देवकीकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष गिरीश धारवाडकर, माशेल साहित्य सहवासचे अध्यक्ष हनुमंत मांद्रेकर आदी उपस्थित होते.

संतांची व्याख्या सांगताना डॉ. कामत पुढे म्हणाले, जो स्वभावाने शांत, विचार व आचारवंत असतो त्याला संत म्हणावे, आधी केले आणि मगच सांगितले ही ज्यांची कृती व प्रकृती असते त्यांना संत संबोधले जावे, असेही त्यांनी नमूद केले. गोव्याला मराठी भाषेची जशी मोठी परंपरा आहे, त्याचप्रमाणे संत साहित्याची परंपरा आहे. संत सोयरोबानाथ आंबियेसारख्या संतांची गोवा ही जन्मभूमी. संतांबरोबरच संगीत, समाजसुधारणा, अध्यात्म, आधुनिक शास्त्र अशा विविध क्षेत्रात गोव्यातील अनेक विभूतींनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान दिले आहे. या कर्तृत्ववान व्यक्तींचा इतिहास लिहिला जावा व ही जबाबदारी मराठी अकादमीने स्वीकारावी अशी सूचनाही त्यांनी पुढे बोलताना केली. संत साहित्याची निर्मित प्राचीन काळात झाल्यामुळे व त्याला विविध संप्रदायाची बैठक असल्याने त्यावेळची भाषा आजच्या तुलनेत अवघड वाटते. पण संत साहित्यावरील सार्थ ग्रंथामुळे हे साहित्य समजून घेणे अवघड राहिलेले नाही. यासाठी नवीन पिढीमध्ये संत साहित्याची आवड निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

भारतीय संस्कृतीवरील पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव कमी करण्यासाठी नवीन पिढीमध्ये संत साहित्याची ओढ निर्माण करणे आवश्यक आहे. संतांचे अभंग व भजने ही आपल्या संस्कृतीसाठी मिळालेली मोठी देणगी असून हा सांस्कृतिक ठेवा जपून ठेवला पाहिजे, असे मंत्री गोविंद गावडे यावेळी बोलताना म्हणाले. गोवा मराठी अकादमीच्या कार्याची त्यांनी स्तुती केली. अकादमीतर्फे चालणाऱया मराठी भाषा व संस्कृती संवर्धनासंबंधी उपक्रमांना सरकारचा नेहमीच पाठिंबा असेल असे आश्वासनही त्यांनी दिले.

प्राचार्य गोपाळराव मयेकर म्हणाले, भागवत् धर्माचा पाया ज्ञानेश्वरापूर्वी महानुभाव पंतांने जरी घातला असला तरी, ज्ञानदेवांनी त्याला वैचारिक बैठक प्राप्त करून दिली. ज्या माशेल भागात आज हे संत साहित्य संमेलन भरत आहे त्या परिसराला साहित्याचा मोठा इतिहास आहे. थोर साहित्यिक व संशोधक बा. द. सातोस्कर यांनी आपल्या साहित्यातून गोव्यातील संस्कृती व येथील इतिहासाचे विपुल लेखन व संकलन करून नवीन पिढीसाठी ही माहिती संग्रहीत करुन ठेवली आहे. ‘संतसंग’ हे पहिले मराठी मासिक कुंभारजुवे येथील श्री. भंडारी यांनी प्रकाशित केले. त्याचप्रमाणे श्री. सुखठणकर यांनी संस्कृत, मराठी साहित्य या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे, असेही प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी पुढे बोलताना सांगितले. अनिल सामंत यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संमेलनाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. संत साहित्य व त्यातून प्रकट झालेले विचारांचे चिंतन व मंथन व्हावे हा या संमेलनामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करून व संत सोयरोबानाथ आंबिये यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचा डॉ. अशोक कामत यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. परेश प्रभू यांनी सत्कारमूर्तीची ओळख करून दिली. सागर जावडेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. हनुमंत मांद्रेकर, गिरीश धारवाडकर यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी तर अशोक नाईक यांनी आभार मानले. त्यानंतर विविध विषयावर सत्रे झाली.

Related posts: