|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मालपे हायवेवर भीषण अपघात चालकासह महिला ठार

मालपे हायवेवर भीषण अपघात चालकासह महिला ठार 

प्रतिनिधी/ पेडणे

मालपे हायवेवर पंजाबी धाब्यासमोर शनिवारी सकाळी 9.05 वाजता झालेल्या अपघातात झेन वाहनातील चालक व त्यात मागे बसलेली महिला ठार होण्याची घटना घडली. हा अपघात मालपे राष्ट्रीय महामार्गावर पंजाबी धाब्यासमोर घडला.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडेली-खुटवळवाडी ता. वेंगुर्ला (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील झेन वाहन क्र. एमएच 07, बी 1980 व आयशर पिकअप वाहन क्र. डीएन 09, एन 9943 हा वेर्णेहून गुजरात येथे टाक्या घेऊन जात होता. तर झेन चालविणारा चालक महादेव विजय वराडकर (वय 42, रा. आडेली -खुटवळवाडी वेंगुर्ला) व त्यात प्रवास करणारे रत्नकुमार दामले (वय 53) व त्यांची पत्नी भाग्यश्री रत्नकुमार दामले (वय 53) हे तिघे कामानिमित्त गोव्याला येत होती. खुटवळ फाटय़ानजीक मुख्य रस्त्यावरून जात असताना मालपे पंजाबी धाब्याजवळ पोहोचले असता झेन वाहनाने समोरील असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी प्रयत्न केला व त्यांनी वाहनाला ओव्हरटेक केले, मात्र विरुद्ध दिशेने समोरून येणाऱया आयशर पिकअपला मागून जोरदार धडक दिली. ही धडक जबरदस्त असल्याने पिकअपचा मागील गार्ड (पाईप) वाकडे होऊन झेन वाहन उजव्या बाजूने पूर्णपणे गटारात गेली व बाजूच्या खडकाळ भागाला आपटली. त्यामुळे झेनचा चालक महादेव ऊर्फ मिनेश विजय वराडकर (वय 42, रा. आडेली-खुटवळ ता. वेंगुर्ला सिंधुदुर्ग) व भाग्यश्री रत्नकुमार दामले (वय 53) ही दोघे जागीच ठार झाली. मयत महिलेचा पती रत्नकुमार दामले हा जखमी असून त्यांच्यावर आझिलो इस्पितळात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती पेडणे पोलीस स्थानकाला मिळताच पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक सागर धाटकर, हवालदार दिगंबर कांबळी व अन्य पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना व जखमी झालेल्यांना 108 रुग्णवाहिकेने इस्पितळात नेण्यात आले. या दरम्यान, वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला. वाहतूक विभाग पेडणेचे उपनिरीक्षक सचिन नार्वेकर, हवालदार भोमी शेटकर, संतोष गंवडी, प्रीतेश तेली, आश्विनी तिरोडकर, अनंत नाईक, नरेश नार्वेकर, विश्वास महाले यांनी वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, आयशर पिकअपचा चालक मोहम्मद हमिन (वय 22, रा. उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिगंबर कांबळी करीत आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

मालपे हायवे ते नईबाग रस्ता मृत्यूचा सापळा

मालपे ते नईबाग हायवे पुलापर्यंतचा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून यापूर्वी या रस्त्यावर अनेक अपघात होवून अनेकांचे जीव गेलेले आहेत. यापूर्वी मालपे पेट्रोलपंपजवळ गुजरात येथील टूर टॅव्हल्स वाहनाला अपघात होवून अनेकजण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे. हल्लीच कंटेनर, मुंबई-गोवा प्रवासी बस व ट्रक यांच्यात हल्लीच मालपे पेट्रोल पंपजवळ अपघात झाला होता. सुदैवाने या जीवितहानी झाली नाही. मात्र शनिवारी झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने हा रस्ता खरोखरच मृत्यूचा सापळा बनल्याच्या प्रतिक्रिया या भागात नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे

कुटुंबांची कुटुंबे उद्ध्वस्त होणाऱया या रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी होत आहे. वेडीवाकडी वळणे हटवून रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्याची जोरदार मागणी होत आहे. हा रस्ता अपघात क्षेत्र म्हणून फलक उभारून यासंबंधी जागृती करण्याचीही मागणी होत आहे.

Related posts: