|Sunday, August 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » एक चावट मधुचंद्रची 150 व्या प्रयोगाकडे वाटचाल

एक चावट मधुचंद्रची 150 व्या प्रयोगाकडे वाटचाल 

एक चावट संध्याकाळनंतर आलेल्या निर्माती सुनंदा वारंग यांच्या ‘एक चावट मधुचंद्र’ या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री महाकाली चित्र, सिद्धांत निर्मित आणि एक्स फॉर यू नॅशनल वुमन ग्रुप एंटरटेनमेंट संचालित, रमेश वारंग लिखित आणि दिग्दर्शित ‘एक चावट मधुचंद्र’ या नाटकाला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून हे नाटक 150 व्या प्रयोगाकडे वाटचाल करीत आहे. हे नाटक नावावरून जरी चावट वाटत असले तरी यात केवळ चावटपणा नसून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या नाटकात एकही नावाजलेला कलाकार नसून सर्व उदयोन्मुख कलाकारांनी नाटकाची धुरा सांभाळली आहे.

भारतात सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढू लागले आहे. काही नवदाम्पत्याचे घटस्फोट मधुचंद्राच्या दुसऱया दिवशी झालेली अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे मूळ कारण म्हणजे शारीरिक संबंधांबद्दलची अज्ञानता आणि असमजूतपणा. लग्न झाले की नवदाम्पत्य सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागतात. एकमेकांना समजून घेणे, त्यांचा स्वभाव, त्यांचे राहणीमान, त्यांच्या कुटुंबीयांशी मिळून मिसळून वागणे हे सर्व पर्यायाने आलेच. पण बऱयाच अंशी असं काही घडत नाही. मधुचंद्राच्या रात्री फक्त शारीरिक संबंधांना प्राधान्य न देता एकमेकांना समजून घेणे, आपल्या आवडी निवडीत सहभागी होणे, एकमेकांच्या गरजा ओळखणे याकडे लक्ष पेंद्रीत केले की घटस्फोटाची प्रकरणे खूपच कमी होतील. हेच ‘एक चावट मधुचंद्र’ या नाटकात मुद्देसूद दाखवण्याचा लेखक- दिग्दर्शक रमेश वारंग यांनी प्रयत्न केला आहे. घटस्फोट का होतो? तो कसा टाळता येऊ शकतो? याची माहिती धमाल विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना या नाटकात पहायला मिळणार आहे. संपूर्णपणे विनोदी असणाऱया या नाटकाचा शेवट चटका लावणारा असून प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आहे. यात सायली लिमये, तेजस जांभावडेकर, रेश्मा डोयले चेटीयार, तेजस्विनी जोईल, मीनाक्षी कोंडाळकर आणि चावट भैय्याच्या भूमिकेत रमेश वारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हय़ा नाटकाला डॉ. शांताराम कारंडे आणि सुधाकर नार्वेकर यांचे विशेष सहकार्य लाभले असून निर्मिती सहाय्य गणेश लिंगायत, पूजा यादव, अजित काटे, कश्यप कांबळे, विश्वजित राऊत, शिवानी जाधव, अजिंक्य शेवाळे यांनी केले आहे.

रमेश वारंग या नाटय़वेडय़ा तरुणाने याआधी वेगळय़ा आशयाचे ‘नेता आला रे’ या नाटकाची यशस्वी निर्मिती केली असून छोटा भीम आणि माय आयडॉल डॉ. अब्दुल कलाम या दोन बालनाटय़ाचीही निर्मिती केली आहे. नुकतेच त्यांचे ‘अभी तो हम जवान है’ हे नाटक रंगभूमीवर आले असून कोकणकन्या एक्प्रेस आणि प्रेमाच्या आधी ब्रेकअपच्या नंतर ही त्यांची दोन आगामी नाटके लवकरच रंगभूमीवर येणार आहेत.