|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » रॅडव्हेन्स्का पराभूत मुगुरूझा, फेडरर विजयी

रॅडव्हेन्स्का पराभूत मुगुरूझा, फेडरर विजयी 

वृत्तसंस्था/ मियामी

मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या रॅडव्हेन्स्काचे आव्हान संपुष्टात आले. तर स्पेनची मुगुरूझा आणि क्रोएशियाची बारोनी यांनी पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरूष विभागात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने तसेच अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोने विजयी सलामी दिली.

महिला एकेरीच्या शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात क्रोएशियाच्या मिर्जेना बारोनीने पोलंडच्या पाचव्या मानांकित ऍग्नेझिका रॅडव्हेन्स्काचे आव्हान तासभराच्या कालावधीत 6-0, 6-3 असे संपुष्टात आणले. 2017 च्या टेनिस हंगामात बारोनीने दुसऱयांदा रॅडव्हेन्स्काला पराभूत केले. गेल्या जानेवारीत बारोनीने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत दुसऱया फेरीत रॅडव्हेन्स्काला पराभूत केले होते. अन्य एका सामन्यात स्पेनच्या सहाव्या मानांकित मुगुरूझाने दोन तासाच्या कालावधीत चीनच्या झेंग शुईचा 4-6, 6-2, 6-2 असा पराभव केला. दुसऱया मानांकित प्लिसकोव्हाने कझाकस्तानच्या पुतीनसेव्हाचा 7-5, 6-3, अमेरिकेच्या बेथेनी मॅटेक सँडस्ने 17 व्या मानांकित रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाचा 4-6, 6-0, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

पुरूषांच्या विभागात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने अमेरिकेच्या टिफोईचा 7-6 (7-2), 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 2017 च्या टेनिस हंगामात फेडररच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसून येत आहे. फेडररचा पुढील फेरीतील सामना अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोशी होणार आहे. डेल पोट्रोने हॉलंडच्या रॉबिन हॅसवर 6-2, 6-4 असा विजय मिळविला. स्वित्झर्लंडच्या टॉप सीडेड वावरिंकाने तासभराच्या कालावधीत अर्जेंटिनाच्या झेबालोसवर 6-3, 6-4 अशी मात केली. क्रोएशियाच्या 20 वर्षीय कोरिकने ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिमचा 6-1, 7-5, ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसने झुमुरवर 6-4, 6-3 अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.

Related posts: