|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दक्षिण गोवा ड्रग्सच्या विळख्यात

दक्षिण गोवा ड्रग्सच्या विळख्यात 

प्रतिनिधी/ मडगाव

गेल्या दोन दिवसामागे मडगाव परिसरात एका युवकाने आत्महत्या केली. हा युवक ड्रग्सच्या आहारी गेल्याची माहिती हाती आली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील युवकाने आत्महत्या केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. ड्रग्समुळे अनेक कुटुंबाना सद्या मानसिक तणावातून जावे लागत आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेली मुले सद्या कोणालाच दाद देत नसल्याने ही गंभीर समस्या बनून राहिली आहे. संपूर्ण दक्षिण गोव्याची किनारपट्टी सद्या ड्रग्सच्या विळख्यात अडकली आहे.

गोव्यात ड्रग्स कुठून येतात व त्याचे मुख्य एजंट कोण याची पूर्ण कल्पना पोलिसांना आहे. ड्रग्स एजंट व पोलीस यांचे साटेलोटे असल्याने पोलीस कारवाई करीत नसल्याचे चित्र सद्या तरी दक्षिण गोव्यात आहे. पोलीस खात्याच्या गुन्हा अन्वेषण विभाग या संदर्भात आपला अहवाल पाठवून देत असले तरी प्रत्यक्षात काहीच होत नाही. यावरूनच एकूण परिस्थितीची कल्पना येते.

या पूर्वी कुडतरी येथे एका बर्थ डे पार्टीत ड्रग्सचा वापर झाल्याने दोघां युवकांचा बळी गेला होता. शिवाय आर्लेम येथे ड्रग्सच्या नशेत दुचाकी चालविताना अपघात होऊन एका युवकाचा बळी गेला होता. शिवाय ड्रग्ससाठी पैसा मिळत नसल्याने अनेक मुले चोरी करण्यात देखील गुंतली आहे. परिस्थिती दिवसेन दिवस नियंत्रणाच्या पलिकडे जात असली तरी पोलीस यंत्रणा मात्र जणू काही होतच नसल्याचा आव आणून वावरत आहे.

गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘ड्रग्स’ प्रकरणी आपण कुणालाही माफ करणार नसल्याचे स्पष्ट निवेदन केले आहे. पण, या निवेदनानंतर देखील सर्व व्यवहार बिनधास्त पणे सुरू आहे. मडगाव, फातोर्डा येथे काही निवडक जाग्यावर ड्रग्सचा व्यवहार होत असल्याची माहिती मिळाली आहे. ड्रग्सच्या नशेत असणारी युवा पिढी कोणत्याही स्थराला जात असल्याने, सर्व सामान्य नागरिक सुद्धा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.

मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळाजवळ खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या जीन्यावर दररोज सायंकाळी मडगाव व फातोर्डा परिसरातील घरंदाज कुटुंबातील मुले ड्रग्सेचे सेवन करीत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केल्याचे मात्र ऐकिवात नाही.

काणकोण पासून वास्को पर्यंतच्या किनारपट्टी भागात ड्रग्सचा व्यवसाय जोमात सुरू आहे. गेल्या काही दिवसामागे सेरनाभाटी येथे एक खुनी हल्ला झाला होता. या खुनी हल्ल्यात गुंतलेली मुले देखील ड्रग्सच्या व्यवसायाशी संबंधीत असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली असली तरी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. काणकोणमध्ये तर स्थानिक युवक देखील ड्रग्सच्या आहारी केल्याने, स्थानिक लोकच आत्ता आवाज उठवित आहे. मात्र, पोलीस का कारवाई करीत नाही हाच सवाल सर्वाना पडलेला आहे.

निदान आत्ता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या विधानानंतर तरी कारवाई होणार का ? हाच खरा प्रश्न आहे. दक्षिण गोव्यात कारवार व बेळगाव मार्गे ड्रग्स गोव्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिवाय किनारपट्टी भागात स्थायिक झालेले काश्मिरी देखील या व्यवसायात गुंतल्याचे सांगितले जात आहे.

Related posts: