|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘पणजी शायनिंग’ कशी होणार?

‘पणजी शायनिंग’ कशी होणार? 

महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा सवाल क्वार्टर्सवाल्यांकडून घरपट्टी, कचरा शुल्क नाही

प्रतिनिधी/ पणजी

सरकारी कार्यलये तसेच सरकारी क्वार्टर्समध्ये राहत असलेल्या सरकारी कर्मचाऱयांकडून मनपाला कोणताही कर मिळत नाही, मात्र मनपाकडून त्यांना सेवा पुरविल्या जात असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले.

पणजी मनपाच्या हद्दीत राज्य तसेच केंद्र सरकारची अनेक कार्यालये आहेत. तसेच रहिवासी क्वार्टर्सही आहेत. पणजीत अशा क्वार्टर्सची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. मनपा त्यांना अनेक सुविधा देत आहे, मात्र दोन्ही सरकारची कार्यालये व क्वार्टर्समधून गृह कर तसेच कचरा शुल्क स्वरूपात मनपाला एकही पैसा मिळत नसल्याने पणजी मनपाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

वास्तविक हे पैसे सरकारकडून येणे जरुरीचे असते. सरकारकडूनही काही मिळत नसल्याने मनपाने त्यांना सेवा का म्हणून द्यावी, असा प्रश्न फुर्तादो यांनी उपस्थित केला आहे. आल्तिनो, पाटो, सांत इनेझ, तसेच मनपाच्या हद्दीत सरकारी वसाहतीत सरकारी कर्मचारी राहत आहेत.

गेल्या सहा वर्षापासून राज्य सरकारकडून सुमारे 15 कोटी रुपयांचा वेतन निधी अजूनही मनपाला मिळालेला नाही. मनपा सध्या पैशांसाठी तारेवरची कसरत करीत आहे. मनपा क्षेत्रातील घरपट्टीच्या स्वरुपात जे 1.5 कोटी रुपये येत असतात त्याच्यातूनच कर्मचाऱयांचे वेतन दिले जात आहे. मनपाला सरकारकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहकार्य मिळत नसल्याने पणजी ‘शाईन’ होणे कसे शक्य आहे असा प्रश्न फुर्तादो यांनी केला आहे.

सरकारच्या अनेक जुन्या इमारती आहेत, तिथे तिसऱया चौथ्या मजल्यावर सरकारी कर्मचारी राहत आहेत. त्यांचा कचरा गोळा करण्यासाठी मनपाचे कामगार पायपीट करीत इमारती चडत असतात. त्यांना पगार कसा द्यायचा असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारकडून योग्य वेळी योग्य निधी मिळाल्यास पणजी शायनिंग होण्यास वेळ लागणार नाही, असेही फुर्तादो यांनी सांगितले.

Related posts: