|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जम्मूमध्ये हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मूमध्ये हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

वृत्तसंस्था/ श्रीनगर

दक्षिण काश्मीर भागातील पुलवामा जिल्हय़ात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सेनादल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने संयुक्तपणे ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडे दोन रायफल्स आणि मोठय़ा प्रमाणात दारूगोळा मिळून आला. या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

सेना दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामा जिल्हय़ातील पदमपुरा गावात काही दहशतवाद्यांनी आसरा घेतल्याची खबर मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या एसओजीच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. त्याचवेळी चेकनाक्यावर एका गाडीतून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तथापि सेना दल आणि एसओजीच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे डीआयजी एस. पणी यांनी सांगितले. त्यांच्याजवळून दोन रायफल्स आणि दारूगोळा जप्त केला आहे. मारले गेलेले हे दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या संपर्कात होते. बारामुला जेलमधील फुटिरतावादी नेता मशर्रत आलम याच्या सुटकेसाठी तेथील अधिकाऱयाला लक्ष्य करण्याचा त्यांचा कट होता, असे अधिकाऱयांच्या चौकशीमध्ये पुढे आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 एप्रिल रोजी महामार्गावरील देशातील सर्वात मोठय़ा बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी जम्मूत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे डीआयजी पणी यांनी सांगितले.