|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » योगाद्वारे आपण परमेश्वराशी सांगड घालू शकतो

योगाद्वारे आपण परमेश्वराशी सांगड घालू शकतो 

प्रतिनिधी/ पणजी

योगाच्या माध्यमाने व्यक्ती आपली सांगड परमेश्वराशी घालू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथील आयनॉक्सच्या आवारात उभारण्यात आलेल्या योग महोत्सवाच्या सभागृहात बोलताना केले. काल सोमवारी दुपारी 12 च्या दरम्यान झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये तीन दिवसीय गोवा योग महोत्सवाचा समारोप झाला.

 आपले शरीर स्वस्थ असेल, तर आम्ही समाजाचे व देशाचे ऋण फेडू शकतो. शारीरिक व मानसिक आरोग्य आपण योगाच्या माध्यमाने मिळवू शकतो. योगाच्या माध्यमाने यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान व समाधी या योगाच्या आठ अंगांद्वारे एक एक पायरी चढत गेलो तर आपण परमेश्वराशीही एकरूप होऊ शकतो. आज राज्यात योगाची जागृती सर्व संघटना आपापल्या परीने करीत आहेत. या संघटनांनी हा योग महोत्सव यशस्वी करण्यासाठी आपल्यापरीने योगदान दिल्याबद्दल व एकत्र येऊन कार्य केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो, असे नाईक पुढे म्हणाले.

 व्यासपीठावर सभापती डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने तर केंद्रीय आयुषमंत्री समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते. व्यासपीठावर गोवा योग महोत्सव समितीचे अध्यक्ष व आयुर्वेद महाविद्यालयाचे चेअरमन पांडुरंग घाटे, महोत्सव समितीचे सचिव प्रितेश देसाई यांचीही उपस्थिती होती. यावेळी योगश्री स्पर्धेच्या निकालाबरोबरच वेगवेगळ्या गटांमधील योगस्पर्धा विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सूर्यनमस्कारांचा जागतिक विक्रम करणाऱया पंकज सायनेकरचा सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात आला.

 तिसरा राष्ट्रीय योग महोत्सव लखनऊमध्ये 

यावर्षी जून महिन्यात होणारा तिसरा राष्ट्रीय योग महोत्सव उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरात होणार असल्याची माहिती आयुषमंत्र्यांनी दिली. देशातील 10 राज्यांमध्ये राष्ट्रीय योग महोत्सवाविषयी जागृती करण्यासाठी योग महोत्सव आयोजित करण्यात आला होता, असे नाईक म्हणाले. प्रितेश देसाई यांनी महोत्सवाच्या प्रतिसादाविषयी माहिती दिली.

 योग शिकविणारे भारतीयच असावेत : सावंत

उपस्थित योगप्रेमी प्रेक्षकांना संबोधित करताना सभापती डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की श्रीपादभाऊ केंद्रीय आयुषमंत्री झाल्यापासून देशभरामध्ये योगविषयक व आयुर्वेदाबद्दल कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात तसेच चांगल्याप्रकारे होत आहेत. आपल्या देशात योगशिक्षक म्हणून तयार झालेले युवक अथवा तरूण योगप्रशिक्षक आपल्या देशामध्ये व इतर देशांमध्ये योग शिकविण्यासाठी गेले पाहिजेत. योगाची देणगी जगाला दिलेल्या या देशामध्ये योग शिकविणारेही भारतीयच असले पाहिजेत. नाहीतर बऱयाचवेळा असे होते, की महान गोष्टी जन्माला आलेल्या आपल्या देशातील लोकांनाच त्या गोष्टी शिकविण्यासाठी अनेकदा विदेशातील व्यक्तींना पाचारण करावे लागते. असे होऊ नये, यासाठी योग शिकविणारे शिक्षकही भारतीयच असावेत, अशी इच्छा डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.

 पंकज सायनेकरचा चषक देऊन सत्कार

सूर्यनमस्कार घालण्याचा जागतिक विक्रम निर्माण केलेला युवा योगपटू व पतंजली योग केंद्राचा योगशिक्षक पंकज अरविंद सायनेकर यांचा श्रीपाद नाईक व डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मान करण्यात आला. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे भारतातील प्रतिनिधी एल. फ्रँकलिन हर्बर्टदास यांनी पंकज सायनेकर याने केलेल्या विश्वविक्रमाचे विवेचन करताना त्याने गाठलेल्या यशाबद्दल माहिती दिली. 

 विशाल गावस ठरला ‘योगश्री’

युवा योगपटू विशाल गावस हा यावर्षीच्या ‘योगश्री 2017’ पुरस्काराचा पुरूष गटामध्ये मानकरी ठरला तर महिला गटामध्ये मेघा कांबळी ही ‘योगश्री 2017’ पुरस्काराची मानकरी ठरली. लहान मुलांच्या वय वर्षे 10 ते 15 या वयोगटामध्ये अब्दुल खान पहिला, वेदांत माईणकर दुसरा तर प्रजय गावडे तिसऱया क्रमांकाचा विजेता ठरला. याच वयोगटामध्ये मुलींमध्ये अक्षता हळर्णकर पहिली, तेजस सतरकर दुसरी तर अंकीता गावडे तिसरी आली. 15 ते 30 या वयोगटामध्ये विशाल गावस प्रथम, लौकीक गावडे द्वितीय व दौलसाब वतार तृतीय क्रमांकावर आला. मुलीमध्ये या वयोगटामध्ये मेघा कांबळी प्रथम, काजलकुमारी झा द्वितीय तर सरस्वती हिरेमठ तृतीय क्रमांकावर आली. वय वर्षे 30 ते 50 या वयोगटामध्ये दामोदर गोवेकर पहिला, कल्पेश मुळगावकर दुसरा तर राघवेंद्र बिलगीकर तिसऱया क्रमांकावर विजेता ठरला. या वयोगटातील महिला गटामध्ये ज्योती दुबे प्रथम, संगीता जाधव द्वितीय तर डॉ. सुनीता नागवेकर तृतीय क्रमांकावर विजेत्या ठरल्या. 50 वर्षे व पुढे या वयस्कर योगपटूंच्या गटामध्ये पुरूषांमध्ये भानुदास चौधरी विजेते ठरले. गजानन जोशी दुसऱया क्रमांकावर तर उल्हास वेर्णेकर तिसऱया क्रमांकावर उपविजेते ठरले. या वयस्कर गटातील महिलांमध्ये नीलम मराठे यांनी प्रथम क्रमांक, भामिनी शिरोडकर यांनी दुसरा क्रमांक तर कमळ फुलारी तिसऱया क्रमांकावर उपविजेत्या ठरल्या. 

शिक्षा सदन, डॉन बॉस्को यांचेही यश

‘रिदमिक योग’ अथवा तालबध्द योग या संगीतावर आधारीत योगाची विविध आसने करण्याच्या सांघिक क्रीडा प्रकारामध्ये शिक्षा सदन हायस्कूल, फोंडा ही शिक्षणसंस्था प्रथम क्रमांकाने विजेती ठरली. उपविजेता संघ [e@ve बॉस्को कॉलेज या शिक्षणसंस्थेचा योगपटूंचा गट ठरला तर गव्हर्नमेंट मिडल हायस्कूल, म्हापसा या शिक्षणसंस्थेच्या गटाला तिसऱया क्रमांकावर उपविजेतेपद मिळाले. योग मॅरेथॉन या धावण्याच्या स्पर्धेमध्ये पुरूष गटामध्ये अजय विश्वकर्मा (प्रथम), राहुल कुमार (द्वितीय) आणि प्रद्युम्न नाईक (तृतीय) विजेते ठरले तर महिला विभागामध्ये सुप्रिया गावकर पहिल्या तर अंकीता पालेकर दुसऱया क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. योग मॅरेथॉन अंध असूनही पूर्ण केल्याबद्दल संदीप मोरजकर या अंध योगपटूला विशेष पुरस्कार देण्यात आला. बक्षीसवितरण अतिशय उत्साही वातावरणात पार पाडले. प्रीतेश देसाई यांनी आभार मानले.