|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » भूपतीने निवडले चार एकेरी खेळाडू

भूपतीने निवडले चार एकेरी खेळाडू 

डेव्हिस चषक लढत : लियांडर पेस, रोहन बोपण्णा राखीव खेळाडू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उझ्बेकिस्तानविरुद्ध होणाऱया डेव्हिस चषक लढतीत भारतीय डेव्हिस संघाचा बहिस्थ कर्णधार महेश भूपतीने धाडसी निर्णय घेतला असून त्याने अनुभवी लियांडर पेस व रोहन बोपण्णा यांना राखीवमध्ये ठेवत चार एकेरीच्या खेळाडूंना निवडले आहे.

रामकुमार रामनाथन (269 वे मानांकन), युकी भांब्री (307), प्रज्ञेश गुनेश्वरन (325) व एन.श्रीराम बालाजी यांना प्रमुख खेळाडू म्हणून या लढतीसाठी भूपतीने निवडले असून ही लढत 7 ते 9 एप्रिल या कालावधीत बेंगळूरमध्ये होणार आहे. फक्त एकेरीचे खेळाडू डेव्हिस चषक लढतीत खेळविण्याची ही बहुधा भारताची पहिलीच वेळ असावी. डेव्हिस चषकामध्ये दुहेरीची लढत हे नेहमीच भारताचे बलस्थान राहिले असून नव्वदीच्या दशकाअखेर स्वतः भूपती व पेस फक्त डेव्हिस चषकामध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक बलाढय़ जोडी म्हणून ओळखली गेली होती. या लढतीसाठी फक्त एकेरी स्पेशालिस्ट खेळाडू निवडण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असल्याचे भूपतीने म्हटले होते. आणि त्याने आपल्या पसंतीचा संघ निवडण्याचा अधिकाराचा वापर केल्याचे दिसत आहे. मात्र प्रत्यक्ष लढत सुरू होण्याआधी यामध्ये बदल होऊ शकतो. कारण नियमानुसार लढतीआधी दोन खेळाडूंना बदलण्याची मुभा आहे.

एआयटीएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कर्णधाराशी चर्चा केल्यानंतर निवड समितीने संघाची निवड केली असून विष्णू वर्धनची सातवा खेळाडू म्हणून सरावासाठी निवड करण्यात आली आहे.’ अंतिम चार खेळाडूंची निवड करताना खेळाडूंची विचारात घेतली जाईल, असे भूपतीने म्हटले होते आणि तेच त्याने केले असल्याचा दावा केला आहे. ‘मी या खेळाडूंचा पाठपुरावा करीत असून त्यांच्या कामगिरीला बक्षीस देण्याची गरज मला वाटते,’ असे भूपतीने या चार खेळाडूंच्या निवडीविषयी विचारले असता सांगितले. मात्र गरज वाटल्यास पेस किंवा बोपण्णाला संघात स्थान दिले जाऊ शकते, हेही त्याने मान्य केले.

या लढतीसाठी सहा जणांच्या संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर बोपण्णा व पेस यांची एटीपी टूरमधील कामगिरी निराशाजनक झाल्याचे दिसून आले. इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेत दोघेही पहिल्याच फेरीत पराभूत झाले तर त्याआधी आयर्व्हिंग चॅलेंजर स्पर्धेतही अशीच कामगिरी झाली होती. पेस डेव्हिस चषक विश्वचषकाच्या उंबरठय़ावर असून मायदेशात खेळण्याची त्याची ही कदाचित शेवटची संधी असेल. त्याने आतापर्यंत डेव्हिस चषकातील दुहेरीत 42 विजय मिळविले असून इटलीच्या निकोला पीत्रांजेलीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. डेव्हिस चषक इतिहासातील सर्वाधिक यशस्वी दुहेरीचा खेळाडू होण्यासाठी त्याला आणखी एकाच विजयाची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याला ही संधी होती. पण विष्णू वर्धनसमवेत खेळताना त्याला पराभव स्वीकारावा लागल्याने ही संधी हुकली होती.

Related posts: