|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

मिरजेत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा 

प्रतिनिधी / मिरज

गुढीपाडव्यानिमित्त निमित्त शहरातील विविध मंडळांच्यावतीने प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये भगवे फेटे आणि पारंपारिक वेशभूषेत पुरूष आणि महिला नागरिक सहभागी झाले हेते.

शोभायात्रा समितीच्यावतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रेचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळी मैदान दत्त मंदिर चौकातून या यात्रेला प्रारंभ झाला. पालखीमध्ये श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली होती. भगवे फेटे आणि पारंपारिक वेशभूषेत नागरिक यामध्ये सहभागी होते. मैदान दत्त मंदिरापासून या मिरवणूकीला प्रारंभ झाला.

 मिरवणूकीत मावळय़ांच्या पोशाखात घोडेस्वार, पारंपारिक वेशभूषेतील महिला, मुले सहभागी होते. विविध संस्थाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. समर्थ प्रतिष्ठानच्या ढोलपथकाच्या ढोलाच्या तालावर ही मिरवणूक पुढे मार्गक्रमण करीत होती. 

ही मिरवणूक तांदूळ मार्केट, महाराणा प्रताप चौक, महात्मा गांधी रोड, टांकसाळ मारूती चौक, शिवनेरी चौकमार्गे काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. मार्गावर ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. या मिरवणूकीत आमदार सुरेश खाडे, मोहन वाटवे, राजू शिंदे, नितीन देशमान, गजेंद्र कल्लोळी दीपाली जाधव यांच्यासह महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी होत्या. सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलन झाले. यामध्ये 100 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होते. गुढीपाडव्यानिमित्त मिरज विद्यार्थी संघामध्ये पंडित शैलेश भागवत यांचे शहनाईवादन झाले.

दरम्यान, शहरात घरोघर गुढय़ा उभारून नव्या मराठी वर्षांचे स्वागत केले. नव्या वर्षांच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत इलेक्ट्रानिक्स वस्तू आणि मोबाईल खरेदीसाठी गर्दी होती. पाडव्याच्या मुहुर्तावर मिरजेचे ग्रामदैवत असलेल्या किल्ला भागातील नृसिंह मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी होती. मालगांव वेसमधील अंबाबाई मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला.  येथेही भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली होती. 

Related posts: