|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध कृषी योजना – ना.खोत

शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध कृषी योजना – ना.खोत 

प्रतिनिधी / इस्लामपूर

महाराष्ट्र शासनाने शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध कृषि योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱयांना थेट बांधावर प्रशिक्षण, हंगामापूर्वीच खते, बि-बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोबरच पसंतीच्या कंपन्यांची अवजारे खुल्या बाजारातून अनुदानासह खरेदी करण्याची मुभा दिली जाणार आहे. जे हक्काचे आहे, ते शेतकऱयाला विना त्रासाचे मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे विविध योजनात पारदर्शीपणा अणून अमंलबजावणी सुरु केली असल्याचे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केले.

शासनाच्या ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी’ या योजनेचा शुभारंभ ना.खोत यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाघवाडी फाटा येथील तालुका कृषी कार्यालयात करण्यात आला. यावेळी कार्यालयासमोर गुढी उभारण्यात आली. गुढीचे पुजन कामेरीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खोत पुढे म्हणाले, पाठीमागील काळात शासन ठरवून देईल, तीच शेती अवजारे शेतकऱयांना घ्यावी लागत होती. मात्र आमच्या शासनाने खुल्या बाजारातून पसंतीची अवजारे घेण्यास मुभा देतानाच त्याचे अनुदान थेट शेतकऱयांच्या खात्यावर जमा होणार आहे. सन 2017 च्या खरीप हंगामापासून कृषि विभागाने उत्पादन वाढीसाठी तालुका हा विकास घटक माणून काम सुरु केले आहे. ठिंबक योजनेसाठी 100 टक्के कर्ज पुरवठा केला जाणार असून पन्नास टक्के भार शासन उचलणार आहे. सुमारे दोन लाख शेतकऱयांना प्रशिक्षण देण्याबरोबरच कृषी यांत्रिकीकरणाची खास मोहिम राबविण्यात येईल.

यावेळी राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी सोयाबीन बिजोत्पादनाला क्विंटलला दहा हजार रुपये दर मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी ग्रेडिंग व पॅकींगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली. यावेळी ना.खोत यांनी आत्मा योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करावा, त्वरीत पाठपुरावा केला जाईल. अशी ग्वाही दिली. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक एन.टी. शिसोदे, जिल्हा कृषी अधिकारी साबळे, तालुका कृषी अधिकारी वाय.एन.पठाण, दि.बा.पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. कार्यालयातील अनुलेखक बी.टी.चौधरी यांनी या आभियानावर गीत तयार केले असून शुभारंभाच्या अगोदर संपूर्ण राज्यात हे गीत ऐकवले जाईल, असे ना.खोत यांनी सांगितले.  आभार उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी मानले.

Related posts: