|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 8 लाख वाहनांच्या विक्रीवर एप्रिलपासून बंदी

8 लाख वाहनांच्या विक्रीवर एप्रिलपासून बंदी 

बीएस-3’ इंजिनमुळे यक्षप्रश्न : वाहन कंपन्यांच्या फायद्यापेक्षा लोकांचे आरोग्य महत्त्वाचे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

“वाहन कंपन्यांच्या फायद्यापेक्षा देशातील जनतेचे आरोग्य महत्त्वाचे आहे’’ असे स्पष्टीकरण देत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिलपासून ‘बीएस-3’ (भारत स्टेज-3) इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वाहन कंपन्यांना चपराक बसली आहे. देशात विक्रीसाठी सज्ज असलेल्या विविध कंपन्यांच्या जवळपास 8 लाख वाहनांच्या विक्रीला यामुळे निर्बंध बसणार आहेत.

बीएस-3 वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एप्रिलपासून ‘बीएस-3’ वाहनांची विक्री करता येणार नाही. त्यामुळे आतापर्यंत विक्री न झालेल्या लाखो गाडय़ा भंगारात जाण्याची किंवा त्यांचे इंजिन बदलण्याची वेळ कंपन्यांवर येणार आहे. वाहनांमधून कार्बन उत्सर्जनासाठीचे नवे मानक लागू होण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने वाहन क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. देशात 1 एप्रिलपासून ‘भारत स्टेज-4’ म्हणजेच ‘बीएस-4’ उत्सर्जन मानकाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून ‘बीएस-3’ वाहनांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे.

‘बीएस-3’ वाहनांच्या वापरासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती एम. बी. लोकुर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झाली. यावेळी वाहन कंपन्या आणि सरकारी वकिलांच्यावतीने ‘बीएस-3’ वाहनांच्या विक्रीची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने स्पष्ट शब्दात प्रदूषण पसरवणाऱया वाहनांना रस्त्यावर उतरवण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले. सद्यस्थितीत वाहन कंपन्यांकडे 8 लाख वाहने विक्रीविना पडून असून त्यांच्यामध्ये ‘बीएस-3’ दर्जाच्या इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास 6 लाख दुचाकींचा समावेश आहे. या सर्व वाहनांची अंदाजित किंमत 12 हजार कोटी रुपये असल्याचा दावा केला जात आहे.

 

विक्रीच्या प्रतिक्षेतील ‘बीएस-3’ वाहने…

दुचाकी               6,71,308

तीनचाकी                       40,048

व्यावसायिक                   96,724

कार                   16,198

 

काय आहे ‘बीएस-3’…

‘बीएस-3’ म्हणजे ‘भारत स्टेज-3’ हा गाडय़ांच्या इंजिनचा प्रकार आहे. ‘बीएस-3’ दर्जाचे इंजिन वापरलेल्या गाडय़ांमधून अधिक प्रदूषण होत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे आता वाहनांना ‘बीएस-4’ दर्जाचे सुधारित इंजिन वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘बीएस-4’ इंजिनमुळे वाहनांमुळे होणाऱया प्रदुषणाची पातळी खालावेल असा अंदाज आहे. देशात 1 एप्रिलपासून ‘बीएस-4’ उत्सर्जन मानकाची अंमलबजावणी होणार आहे.

 

 

 

‘मद्यापेक्षा लोकांचे आयुष्य महत्त्वाचे…’

आणखी एका महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीवेळीही न्यायालयाने लोकांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची टिपण्णी केली आहे. महामार्गानजिकची दारू दुकाने बंदी करण्यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीवेळीही न्यायालयाने ‘मद्यापेक्षा लोकांचे आयुष्य जास्त महत्त्वाचे आहे’, असे निरीक्षण नोंदवत महामार्गाशेजारची दारूदुकाने बंद करण्याचे समर्थन केले. महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत दारू दुकाने थाटण्याला परवानगी देऊ नये, असे मत न्यायालयाने नोंदवले होते. महामार्गांवरील अपघातांमध्ये दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दारूच्या दुकानांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र, यासंबंधी दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकेची सुनावणी बुधवारी झाली. यावेळी केंद्र सरकारतर्ये ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी महामार्ग आणि दारू दुकान यामधील अंतर कमी करण्यासंबंधी युक्तिवाद मांडला.

Related posts: