|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गव्यारेडय़ाच्या हल्ल्यात एकाचा बळी

गव्यारेडय़ाच्या हल्ल्यात एकाचा बळी 

प्रतिनिधी/फोंडा:

शिवडे-धारबांदोडा येथे काजू बागायतीमध्ये गेलेल्या एका व्यक्तीवर गव्यारेडय़ाने हल्ला करुन त्याचा बळी घेतला. येणू पांडुरंग सोलयेंकर (54 वर्षे) असे त्याचे नाव असून बुधवारी दुपारी ही घटना घडली. मात्र शोधाशोध केल्यानंतर रात्री त्याचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला. सध्या या भागात काजूचा हंगाम जोरात सुरु आहे. या घटनेमुळे रानावनात वावर असलेल्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

येणू याच्या घरापासून शंभर मिटरच्या अंतरावर काजूच्या बागायतीमध्ये त्यांच्यावर गव्याने हा हल्ला केला. सायंकाळी ते घरी न परतल्याने शोधाशोध केल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. सोलयेंकर कुटुंबियांचा उदरनिर्वाह बागायतीच्या पिकांवरच चालत आहे.

गव्याला हाकलण्यासाठी गेले होते येणू

मागील काही दिवसांपासून गव्या रेडय़ांनी त्यांच्या बागायतीमध्ये धुडघूस घालून पिकांची हानी केली होती. काजूच्या झाडांबरोबरच, केळी, अननस व अन्य पिकांवर रानातील गवेरेडे तुटून पडत असल्याने त्यांना हाकलून लावण्यासाठी येणू हे बुधवारी दुपारी 2 वा. सुमारास बागायतीमध्ये गेले होते. याचवेळी गव्यारेडय़ाने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना जागीच ठार केले. त्यांच्या पोटावर, पायांवर व पाठीवर शिंगे खुपल्याच्या मोठय़ा जखमा तसेच छातीवर पायांच्या खुरांच्या गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.

सकाळी बचावले पण दुपारी मृत्यूने गाठले

सकाळच्यावेळी गव्यारेडय़ांच्या आवाजामुळे येणू हे त्यांना हाकलून लावण्यासाठी बागायतीमध्ये गेले होते. यावेळी हा गवारेडा त्यांच्या मागे लागला होता. प्रसंगावधान राखून त्यांनी एका झाडावर चढत त्याच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली होती. मात्र दुपारच्यावेळी गव्याच्या हल्ल्यातून त्यांना आपली सुटका करता आली नाही. हा दुसरा हल्ला त्यांच्या मृत्यूचा काळ ठरला.

 फोंडा पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत येणू यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ व वृद्ध आई असा परिवार आहे.

Related posts: