|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘मनरेगा’ प्रकरणी प्रभारी बीडीओ निलंबित

‘मनरेगा’ प्रकरणी प्रभारी बीडीओ निलंबित 

प्रतिनिधी/ सांगली

जत तालुक्यातील एकोंडी आणि काशिलिंगवाडी या दोन ठिकाणी मनरेगामधून करण्यात आलेल्या शेततलाव आणि मातीनाला बांधकामप्रकरणी एकूण 36 लाख 74 हजार रूपयांचा अपहार झाल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी एकूण 12 जणांच्यावर फौजदारी करण्यात आली आहे. या कारवाईमधील प्रभारी बीडीओ ज्ञानदेव मडके याच्यावर निलंबनाची कारवाई विभागीय आयुक्तांनी केली आहे. तर तत्कालिन सेवानिवृत्त बीडीओ ओमराज गहाणे यांची विभागीय स्तरावरून चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आली आहे 

जत तालुक्यातील एकोंडी, काशिलिंगवाडी आणि बाज या तीन ठिकाणी मनरेगा कामात मोठा घोटाळा झाल्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश सीईओ डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी प्रशासकीय चौकशी समिती नेमली होती. या समितीमध्ये  समितीचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजय माने, मुख्य लेखा व वित अधिकारी राजेंद्र गाडेगर, तहसिलदार अभिजीत पाटील, पाणीपुरवठा अभियंता आर.एस.बारटक्के, आणि या समितीचे सचिव म्हणून रवींद्र आडसुळ यांनी काम पाहिले. त्यानंतर हा अहवाल सीईओ डॉ. भोसले यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने  याप्रकरणी दोषी असणाऱयांच्यावर जत पोलीस ठाण्यात थेट फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. आणि त्यानुसार 12 जणांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकोंडीत एकही शेततलाव न काढता 24 लाख 19 हजार रूपये खर्च केले

 जत तालुक्यात एकेंडी येथे प्रत्यक्षात कोणताही शेततलाव न करता 13 हून अधिक शेततलाव काढण्यात आले असे दाखवून 24 लाख 19 हजार रूपयांचा अपहार करण्यात आला आहे. ही कामे सर्व कागदोपत्री दाखवून हा अपहार करण्यात आला आहे. एकेंडी गावात वार्षिक कृती आराखडा कार्यक्रमात कोणतीही कामे करणचे आदेश नव्हते. तसेच या गावात कोणतेही शेततळे असावे अशी मागणी नव्हती. प्रशासकीय तसेच तांत्रिक मंजूरी नव्हती. त्याचे कोणतेही रजिस्टर नव्हते. पण या गावात 13 हून अधिक शेततलाव काढण्यात आले. ही शेततळे कामगारांच्या मार्फत काढले आहेत. याठिकाणी 270 कामगार उपस्थित होते. या कामगारांचे रजिस्टर तयार करण्यात आले. तसेच त्यांचे पगारपत्रक तयार करण्यात आले. त्यांच्या नावाने रक्कमा पाठविण्यात आल्या आहेत. आणि त्या रक्कमा त्या मजूरांनी विविध प्रकारे काढल्या आहेत. पॉझ मशीन, एटीएम आणि व्हॉवचर व्दारे या रक्कमा त्यांनी काढल्या आहेत. असे रेकॉर्ड तयार करून या रक्कमा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 24 लाख 19 हजार रूपयांचा अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी तत्कालिन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे,  प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, कनिष्ठ लेखधिकारी प्रवीण माने, पाच डाटा एंट्री ऑपरेटर या सर्वांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.

काशिलिंगवाडी येथे जुन्याच मातीनाल्याला रंगरंगोटी केली

जत तालुक्यातील काशिलिंगवाडी येथे पुर्वी चार माती नाल्याची कामे करण्यात आली होती. या ठिकाणी जुन्याच कामावर मशिनने हे काम फोडून त्याची रंगरंगोटी करून नवीन कामे केली आहेत असे दाखवून शासनाची फसवणूक करत या कामावर 12 लाख 55 हजार रूपये उचलण्यात आले आहेत. या गावात मातीनाल्याचे काम करावे अशी कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती. ग्रामपंचायतीने तसा ठराव ही करून दिला नाही. किंवा ही जुनी मातीनाला दुरूस्त करा असेही सांगितले नाही.  या नालाबांधकामांची प्रशासकीय मान्यता तयार करण्यात आली  तसेच तांत्रिक मान्यता कृषि अधिकारी कैलासकुमार मारकन यांनी दिले त्यानंतर या जुन्या कामाचा खर्च दाखवून 12 लाख 55 हजार रूपये संगनमताने उचलण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी सहा जणांच्यावर फौजदारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये तत्कालिन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे, सध्याचे प्रभारी  गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, तालुका कृषि अधिकारी कैलासकुमार मारकम, सरपंच एन.डी.बजबळे, ग्रामसेवक सरग, ग्रामरोजगार सेवक देवांग यांच्यावर फौजदारी झाली आहे.