|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुळगावच्या केळबाईचे मयेतील बहिणीकडे वास्तव्यासाठी प्रयाण

मुळगावच्या केळबाईचे मयेतील बहिणीकडे वास्तव्यासाठी प्रयाण 

मुळगावची पेठेची जत्रा उत्साहात बहिणीला दिलेल्या वचनाप्रमाणे मुळगावची देवी मयेत वास्तव्याला

प्रतिनिधी / पणजी

डिचोली तालुक्यातील मुळगाव गावातील देवी महामायाला (केळबाई) आपल्याकडे मये येथे तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी नेण्याचे मयेतील देवी केळबाई या थोरल्या बहिणीने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मुळगावच्या देवी म्हामायचे मयेच्या दिशेने रात्री उशिरा प्रयाण झाले. या प्रथेतील उत्सव म्हणजेच मुळगावची पेठेची जत्रा मोठय़ा उत्साहात संपन्न झाली. रात्री मयेतील देवीचे मोड व चौगुले मानकरी मुळगावात आले व त्यांनी परंपरेनुसार मुळगाव येथून पेठ पारंपरिक वाटेतून मये येथे नेली.

वंडय़ार मये येथील पवित्रस्थानी देवी केळबाई (मये) देवी म्हामाय (केळबाई) मुळगाव व देवी लईराई (शिरगाव) यांच्यात देव खेतोबामुळे झालेल्या वादामुळे देवी केळबाई (मये) व देवी लईराईने पण घेतले व देवी म्हामाय (केळबाई) यांना मुळगाव येथे वास्तव्य करण्यासाठी मयेतील देवी केळबाईने सूचविले. मत्र मुळगाव येथे मोठय़ा संख्येने थोर मोठे देव देवतांचे वास्तव्य असल्याने देवी म्हामाय मुळगावला जाण्यास मागे पुढे होऊ लागली. त्यामुळे वर्षातून एकदा आपण तुला मये येथे आपल्याकडे वास्तव्यासाठी घेऊन येईन, असे वचन मयेतील केळबाईने मुळगावच्या म्हामायला दिले होते. त्या वचनाची पूर्तता म्हणजेच मुळगावात भरणारी पेठेची जत्रा.

या जत्रेनिमित्त सकाळपासून मुळगावातील केळबाई मंदिरात विविध धार्मिक विधी झाल्या. व्रत्तस्त धोंडगणांनी पवित्र तळीवर स्थान करुन देवीचे दर्शन घेतले. रात्री मुळगाव देवीच्या मंदिराबाहेर धोंडगणांनी नृत्य सादर करुन हरेर, हरेरच्या गजराने मंदिर परिसर दणाणून सोडला. रात्री बाराच्या सुमारास मयेतील ग्रामस्थ गावकर मंडळी, मोडपुरुष, चौगुले मानकरी पारंपरिक वाटेतून मुळगाव येथे दाखल झाले. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत देवीची पेठ सजविण्यात आली व ती मोडाच्या डोक्यावर स्वार करण्यात आली. मंदिरासमोरील सभामंडपात गाऱहाणे घातल्यानंतर देवीची पेठ मुळगाव येथून पारंपरिक वाटेने मये येथे जायला रवाना झाली. मध्ये देवाच्या झाडाकडे कौल देऊन पेठ व्हाळशी, बोर्डे, भायली पेठ, सोनारपेठ मार्गे वंडय़ार येथे विश्रांती घेतली व नंतर केळबाईवाडा मये येथील देवी केळाबाईच्या मंदिरात प्रवेश केले.

या मंदिरात थोरली बहीण मयेतील देवी केळबाईची पेठ सजविण्यात आली व दोन्ही बहिणींच्या पेठा मंदिरातून बाहेर पडल्या. नाचत, वाजत, गाजत या दोन्ही पेठा गावकरवाडा मये येथील चव्हाटा येथे आणण्यात आल्या. चव्हाटा येथे या दोन्ही पेठा भाविकांना दर्शनासाठी ठेवल्या जाणार असून दि. 4 रोजी होणाऱया माल्याच्या जत्रोत्सवात मुळगावची देवी केळबाई मुळगावला जाणार तर मयेची केळबाई डोक्यावर आगीने रणरणते माले घेऊन नृत्य सादर करणार.

Related posts: