|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रामाणिक लेखनाला चांगले दिवस येतीलच इंद्रजीत भालेराव यांचे उद्गार

प्रामाणिक लेखनाला चांगले दिवस येतीलच इंद्रजीत भालेराव यांचे उद्गार 

प्रतिनिधी/ मडगाव

लेखकांनी उत्स्फूर्तपणे लिहिले विषय सुद्धा बऱयाच वेळा प्रकाशकांना कळत नाही. चालू मार्केट स्थितीवरच त्याचे लक्ष असते, पण जर तुम्ही प्रामाणिकपणे लेखक केले असेल तर घाबरायचे कारण नाही. कधी तरी त्याला चांगले दिवस येतीलच असे उद्गार इंद्रजीत भालेराव यांनी काल नवोदीत साहित्यिकांना मार्गदर्शन करताना काढले.

मडगावातील गोमंत विद्या निकेतनचा 105 वा वर्धापन दिन सोहळय़ाचा एक भाग म्हणून संस्थेच्या फोमेंतो एम्फी थिएटरमध्ये काल शनिवारी सायंकाळी परभणी येथील मराठीचे ख्यातनाम कवी इंद्रजीत भालेराव यांच्याहस्ते वार्षिक साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री. भालेराव नवोदीत साहित्यिकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर व उपाध्यक्ष सुहास नायक उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना श्री. भालेराव म्हणाले, नवोदीतासाठी महाराष्ट्र शासन स्पर्धा घ्यायचे व त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार द्यायचे, अशा पुरस्काराच्या माध्यमांतूनच मोठे मोठे लेखक उदयास आले, आनंद यादवांना सुद्धा अशाच पद्धतीने हस्तलेखनाचा पुरस्कार मिळाला, आपल्याला सुद्धा असाच पुरस्कार मिळाला व शासनाच्या योजनेतून पहिले पुस्तक प्रकाशित झाले. अशा योजना हय़ा लेखकांसाठी प्रेरणादायी व प्रोत्साहन देणाऱया असतात, त्यांच्यातून नवोदीत लेखक घडतात, अशा लेखकांकडे लक्ष वेधण्याचं काम पुरस्कारांतून होत असते, पुरस्कार मिळाल्यानंतर नावे लोकांसमोर येतात, या लेखकांनी काय लिहिलय याकडे सर्वाचेच लक्ष लागून असते, वाचक सुद्धा अशा लेखनांची वाट पहात असतात, यासाठीच या स्पर्धा व पुरस्कार महत्वाचे असतात.

‘गोमंत देवी’ पुरस्कार मिळाल्या बद्दल खुपच आनंद वाटला. गोव्याने माझा गौरव करावा ही अभिमानाची गोष्ट आहे. महाबळेश्वर सैल हे गोव्यातील लेखकांना अत्यंत जवळचे मॉडेल आहेत. नवोदीत लेखकांनी स्वताला कसे घडवायचे याचे मॉडेल सुद्धा गोव्यातच आहे. जमिनीवर राहून किती उंची गाठता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. ते एक आदर्श आहे. एक मातीचा माणूस वाटतो. कोणत्याही प्रकारची पोज नाही, कोणत्याही प्रकारचा भाव घाणारा नाही. लेखक म्हणून श्री. सैल हा मोठय़ा उंचीचा माणूस असल्याचे श्री. भालेराव म्हणाले.

एस. एल भैरप्पाची पण एक कांदबरी ‘गोदुली’ रखडली. गोदुली मध्ये शेतकरी व गायी हा विषय हाताळण्यात आलेला होता. पण जेव्हा देशात ‘गो’हत्या बंदी विषय निघाला, तेव्हा या गोदुलीला देखील उदंड प्रतिसाद मिळाला. कारण सर्वांनाच या विषयाची उत्सुकता होती. मार्केट असो वा नसो आपण आपल्या लेखनात शेतकरी हाच विषय हाताळला आहे. कारण लेखकाने कोणत्या तरी विषयात सखोल लेखन करणे आवश्यक असते. त्यासाठी एकच कुठला तरी विषय निवडणे महत्वाचे असल्याचे मत मांडले.

यावेळी श्री. भालेराव यांच्या हस्ते कु. समृद्धी राजेंद्र केरकर, प्रा. अरुण नाईक, सौ. प्रशांती आजगावकर (माणगांवकर) आणि संदीप मणेरीकर या नवोदीत साहित्यिकांना यंदा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सुरवातीला संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देविका नाईक हिने केले. आज रविवार दि. 2 रोजी प्रा. गोपाळराव मयेकर यांना (केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार), सौ. स्मिता संदीप केणी (पिरुबाय दलाल स्मृती स्वयंसिद्धा पुरस्कार), शांती अवेदना सदन (काशिनाथ नायक स्मृती सामाजीक कृतज्ञता पुरस्कार) आणि  कवी इंद्रजीत भालेराव (कविवर्य दामोदर अच्चूत कारे गोमंत देवी पुरस्कार) प्रदान करण्यात येईल. श्रीफळ, शाल, मानपत्र आणि रोख दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Related posts: