|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले

मद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले 

प्रतिनिधी/ पणजी

महामार्गापासून 500 मिटरच्या अंतरातील बार व रेस्टॉरंट बंदीवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने राज्यातील बार व रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहेत. शेवटची आशाही मावळल्याने या व्यावसायिकांची धावपळ उडाली आहे. व्यवसाय संपुष्टात आल्याच्या भीतीने मद्य व्यावसायिकांचा गोंधळ उडाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापुढे काही चालणार नाही याची जाणीव असल्यामुळे व्यावसायिक सध्या हवालदिल झाले आहेत.

अन्य राज्यानी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरविचार याचिकांबाबत कोणता निकाल येतो याकडे गोव्यातील मद्य व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र गोव्याबाबत कोणताही विचार होऊ न शकल्याने या व्यावसायिकांची घोर निराशा झाली. सिक्कीम आणि मेघालय या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. मात्र गोव्याबाबत कोणताही विचार होऊ शकला नाही. त्यामुळे मद्य व्यावसायिकांमध्ये घोर निराशा निर्माण झाली आहे. 15 डिसेंबर 2016 ला न्यायालयाने महामार्गालगतच्या बार व रेस्टॉरंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मागील तीन महिन्याच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्य सरकारने किंवा मद्य व्यावसायिक संघटनेने गांभीर्याने लक्ष दिले नाही. निवडणूक आचारसंहितेवर बोट ठेवून संघटना व सरकार गप्प राहिले. निवडणूक निकालानंतरही फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत कुणीही गांभीर्याने विचार केला नाही.

3200 बार – रेस्टॉरंट व मद्यालये संकटात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका राज्यातील 3200 बार व रेस्टॉरंट व मद्यालयांना बसला आहे. राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून 500 मिटरच्या अंतरात असलेली सर्व मद्यालये अडचणीत सापडली आहेत. या व्यवसायाशी संबंधित राज्यात सुमारे 20 हजार कुटुंबे आहेत. त्यामुळे या कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक व्यावसायिक हे छोटे व्यावसायिक आहेत. त्यांच्या कुटुंबांचा चरितार्थ या व्यवसायावर चालतो. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर मोठे संकट आले आहे.

पर्यटन व्यवसायावर परिणाम होणार

गोव्यातील माशांचे जेवण आणि मद्य याबाबत देशी – विदेशी पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटक अगोदर माशांचे जेवण व मद्याचा आस्वाद घेतात. विदेशी पर्यटकांपेक्षा देशी पर्यटक जास्त प्रमाणात मद्याचा आस्वाद घेतात. मद्य आणि माशांचे जेवण याची चव चाखण्यासाठी येणारे पर्यटकही बरेच असतात. विशेष करुन शनिवारी, रविवारी गोव्यात दाखल होणारे शेजारील राज्यातील पर्यटक हे त्यासाठीच येत असतात. आता मद्यालये बंद झाल्यास त्याचा परिणाम पर्यटकांवरही होण्याची शक्यता आहे.

महसुली उत्पन्नावर परिणाम

राज्याच्या महसूल प्राप्तीवरही मोठा परिणाम होणार आहे. राज्याच्या अबकारी खात्याच्या तिजोरीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. 70 टक्के व्यवसाय बंद झाला तर महसुली उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. खाणबंदीने राज्याच्या महसुली उत्पन्नावर मोठा परिणाम केला. थेट दीड ते पावणेदोन हजार कोटींचा महसूल बुडाला. आता अबकारी खात्याचा महसूलही मोठय़ा प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

Related posts: