|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चंद्राबाबूंचा पुत्र आंध्र मंत्रिमंडळात

चंद्राबाबूंचा पुत्र आंध्र मंत्रिमंडळात 

महत्त्वाचे खाते मिळणार :11 नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ

वृत्तसंस्था/ अमरावती

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या मुलाने रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नायडू यांचा पुत्र नारा लोकेशला स्थान मिळाले. नारा याच्याबरोबर आणखी 10 जणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर 5 जणांना मंत्रिपद गमवावे लागले आहे.

चंद्राबाबू यांचा पुत्र नारा लोकेश अलिकडेच विधानपरिषदेचा सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आला होता. 34 वर्षीय नारा लोकेश तेलगू देसम पक्षाचा महासचिव देखील आहे. त्याच्याबरोबरच विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसच्या 3 आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे. या तिन्ही आमदारांनी काही दिवसांपूर्वीच टीडीपीला पाठिंबा दिला होता. नायडू सरकारला भाजपचे समर्थन प्राप्त आहे.

5 मंत्र्यांना देण्यात आला नारळ

नायडू सरकारच्या पहिल्या विस्तारात 5 मंत्र्यांना नारळ मिळाला आहे. यात पल्ले रेड्डी, आर. किशोर बाबू, बी. गोपालकृष्ण रेड्डी, पी. सुजाता आणि के. मृणालिनी यांचा समावेश आहे. 11 नव्या मंत्र्यांसह आता नायडू मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 26 वर पोहोचली आहे. मंत्रिपद गमवाव्या लागेलल्या गोपालकृष्ण रेड्डी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आंध्रप्रदेश मंत्रिमंडळातून हाकलण्यात आल्याने नाराज तेलगू देसम पक्षाचे वरिष्ठ नेते गोपालकृष्ण यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडे पाठविला आहे.