|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रशांत भूषण यांची जीभ घसरली

प्रशांत भूषण यांची जीभ घसरली 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

वरिष्ठ वकील आणि कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी योगी आदित्यनाथ यांच्या रोमियोविरोधी पथकावर टिप्पणी केली. “रोमियोने फक्त 1 मुलीशी प्रेम केले, तर कृष्ण देखील छेडछाड करणारे होते, देखरेख पथकाचे नाव कृष्ण स्क्वॉड ठेवू शकण्याची हिंमत आदित्यनाथ यांच्यामध्ये आहे का?’’ असे अतिशय वादग्रस्त वक्तव्य भूषण यांनी केले. उत्तरप्रदेशात युवतींशी छेडछाड करणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी उत्तरप्रदेशात बनविण्यात आलेले रोमियोविरोधी पथक सध्या चर्चेत आहे. प्रशांत भूषण यांनी या आपल्या वादग्रस्त ट्विटमध्ये शेक्सपिअरच्या नाटकातील पात्र रोमियो आणि भगवान श्रीकृष्णांची तुलना केली.

कृष्णाला समजून घेण्यास अनेक जन्म घ्यावे लागतील, भूषण यांनी कृष्णाला राजकारणात ओढले असे म्हणत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी टीका केली.

टीकेनंतर स्पष्टीकरण

वाद झाल्यानंतर भूषण यांनी आणखी 2 ट्विट करत स्पष्टीकरण दिले. रोमियो पथकावर माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी रोमियो पथकाबाबत म्हणणे मांडले होते. आम्ही भगवान कृष्णाच्या गोपींसोबत छेडछाडीच्या गोष्टींसह लहानाचे मोठे झालो. मला कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवायची नव्हती असे भूषण यांनी म्हटले.

 

युपीत आतापर्यंत 996 पथके

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर योगी सरकारने प्रचारावेळी दिलेले आश्वासन पूर्ण करत 10 दिवसांमध्ये 75 जिह्यात 996 रोमियोविरोधी पथके स्थापन केली आहेत. लखनौ, मेरठ, वाराणसी आणि गाजियाबादमध्ये या मोहिमेला वेग आला आहे. परंतु सप, काँग्रेस आणि बसपने या निर्णयावर टीका केली आहे. या पथकाच्या आड पोलीस प्रामाणिक नागरिकांनाच त्रास देत असल्याचे म्हणणे विरोधकांनी मांडले.