|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोमंत विद्या निकेतन प्रतिभावंताची कदर करणारी संस्था

गोमंत विद्या निकेतन प्रतिभावंताची कदर करणारी संस्था 

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्याची अनेक वैशिष्ठय़े सर्वश्रुत आहे. गोवा ही कलावंताची खाणच आहे. लता मंगेशकरापासून किशोरी आमोणकरांपर्यंत. शास्त्रज्ञ आहेत अनिल काकोडकर काय, रघूनाथ माशेलकर काय. पण नुसती प्रतिभावंत मंडळी असून पुरेस नसतं, त्या प्रतिभावंताची कदर करणारे देखील लागतात आणि गोमंत विद्या निकेतन सारख्या संस्था हे काम निभावते असे उद्गार पुणे येथील ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे यांनी मडगावात बोलताना काढले.

मडगावातील गोमंत विद्या निकेतनचा 105 वा वर्धापन दिन समारंभात श्री. काळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते प्रा. गोपाळराव मयेकर यांना (केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार), सौ. स्मिता संदीप केणी (पिरुबाय दलाल स्मृती स्वयंसिद्धा पुरस्कार), शांती अवेदना सदन (काशिनाथ नायक स्मृती सामाजीक कृतज्ञता पुरस्कार) आणि कवी इंद्रजीत भालेराव (कविवर्य दामोदर अच्चूत कारे गोमंत देवी पुरस्कार) प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर, उपाध्यक्ष सुहास नायक उपस्थित होते.

या प्रसंगी पुढे बोलताना श्री. काळे म्हणाले, चांगल्या कामांच कौतुक क्वचितच ऐकायला मिळत, पण गोमंत विद्या निकेतन हे काम करतय, याच मला खुप कौतुक करावस वाटते, मराठीमध्ये निर्भेळ कौतुक करायची परंपरा फारशी नाही. पुणेकरांमध्ये अजिबात नाही. आणि साहित्य क्षेत्रात तर तिळमात्र नाही. आम्ही जरी महाराष्ट्रीयन असलो तरी गोमंत विद्या निकेतन संस्थे बद्दल मनापासून प्रेम वाटते. या संस्थेत एकदा आलेला माणूस कायम या संस्थेच्या प्रेमातच पडेल, यात तिळमात्र संदेह नाही. कारण तो माझा स्वताचा अनुभव आहे.

चारही गौरवमूर्तीनी आपआपल्या क्षेत्रात बजावलेले कार्य हे महान आहे. त्याचे हे कार्य इतरांना प्रेरणादायी ठरावे असेच आहे. या चार ही गौरवमूर्ती तसेच या पूर्वी गोमंत विद्या निकेतन संस्थेने गौरविलेल्या सर्वांचा परिचय करून देणारी पुस्तिका प्रकाशिक करावे असे मत देखील श्री. काळे यांनी यावेळी मांडले.

यावेळी चारही पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. गोपाळराव मयेकर म्हणाले, मी भाग्यवान माणूस आहे. हल्लीच आपला वाढदिवस माशेल गावात साजरा करण्यात आला. डॉ. अशोक कामत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या गौरव सोहळय़ात परेश प्रभू यांनी आपला परिचय करून दिला तर सागर जावडेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. हे दोन्ही आपले बांदेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व आज दोघेही गोव्यातील दोन वर्तमान पत्राचे संपादक आहेत हेच आपले भाग्य आहे.

आपले पुढील संकल्प सांगताना प्रा. मयेकर म्हणाले की, ज्ञानेश्वरीचा 1 ते 9 भाग पूर्ण झाले आहे. आत्ता 10 ते 18 भागाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शिवाय गोमंतकाची मराठी अस्मिता या विषयावर पुस्तक लिखाण सुरू आहे. त्याचबरोबर गोमंतकाची नैतिक पातळी खाली आली का ? या विषयावर विचार मथन सुरू आहे व त्यावर देखील पुस्तक निघणार आहे.

काशिनाथ नायक स्मृती सामाजीक कृतज्ञता पुरस्कार शांती अवेदना सदन तर्फे डॉ. एल. जी. डिसोझा यांनी स्वीकारला, यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, शांती अवेदना सदनमध्ये कॅन्सर ग्रस्त रूग्णांना ठेवले जाते, या ठिकाणी रूग्णांना जीवन जगण्याची आशा निर्माण केली जाते. रूग्णांचे दुखणे कमी करून, त्यांना आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कोणीच असे समजू नये की, शांती अवेदना सदन ही मृत्यूचे ठिकाण आहे.

सुरवातीला संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी सर्वाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूपा शिकनीस यांनी केले.

Related posts: