|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नो-फ्लेक्स झोनवरच फलकांची गर्दी

नो-फ्लेक्स झोनवरच फलकांची गर्दी 

प्रशासनाच्या आदेशाला फलकबहाद्दरांचा चुना, अपघातप्रवण क्षेत्र बनतेय मृत्यूचा सापळा

प्रतिनिधी/ कराड

अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या येथील कोल्हापूर नाक्यावर डिजीटल फलकांची गर्दी पुन्हा वाढली आहे. नगरपालिकेसह पोलीस, रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षाने फलकबहाद्दरांचे फावले असून अपघातप्रवण क्षेत्र असलेला कोल्हापूर नाका मृत्यूचा सापळा बनला आहे.

कराड परिसरात सातत्याने अपघातांची मालिका सुरू असणारे ठिकाण म्हणजे कोल्हापूर नाका. गत आठवडय़ातच कोल्हापूर नाक्यावर भरधाव कंटेनरच्या धडकेत स्वप्नील मोहने या युवकाचा बळी गेला. यापूर्वीही अशाप्रकारे जीवघेणे अपघात या ठिकाणावर झाले आहेत. कोल्हापूर नाक्यावरच अपघातप्रवण क्षेत्र म्हणून फलकही लावण्यात आला आहे. वास्तविक अपघातप्रवण क्षेत्रात वाहतुकीचे अतिक्रमण, डिजीटल फलक, अवैध थांबे नसावेत, असा नियम आहे. मात्र कराडच्या कोल्हापूर नाक्यावर खासगी वाहतूकदारांचे अवैध थांबे वर्षानुवर्षे आहेत.

हे दुखणे बरे करण्याचे धाडस प्रशासनात आहे की नाही याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. खासगी वाहतूकदार सर्रास प्रवासी घेण्यासाठी महामार्गावर थांबलेले असतात. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. यातच भर म्हणून की काय कोल्हापूर नाक्यावर नेहमीच डिजीटल फलकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असते.

सर्वच पक्षांसह विविध संघटनांकडून डिजीटल फलक लावण्याची स्पर्धाच सुरू असते. फलकांचा आकार किंवा ते किती दिवस ठेवावेत याचेही भान राखले जात नाही. अनेक फलक महिनोन्महिने तेथे असतात. मध्यंतरी पोलीस उपअधीक्षकांनी डिजीटल फलक लावण्यास सक्त मनाई करत कारवाईचा इशारा दिला होता. कोल्हापूर नाक्यावरील डिजीटल फलक जप्त करून पोलिसांकडून शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत पुन्हा फलकबहाद्दर डोके वर काढू लागले आहेत.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी वाहतुकीच्या प्रश्नावर गंभीर होत बैठका घेतल्या होत्या. स्थानिक प्रशासनाला वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठीच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र नव्या व्यवस्था निर्माण होत नसतील तरी चालेल; मात्र सध्या कारवाईसाठी तरी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी होत आहे.

कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक बिघडत्या स्थितीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत प्रशासनाने विचार करून कारवाईची मोहीम सुरू करायला हवी. तरच येथील परिस्थिती सुधारेल नाहीतर अपघातांची संख्या वाढणार आहे. यासाठी कराड शहरातील विविध संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.