|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सोनसडय़ावरील कचऱयाचे 50 टक्के ढीग पावसाळय़ापूर्वी हटणार

सोनसडय़ावरील कचऱयाचे 50 टक्के ढीग पावसाळय़ापूर्वी हटणार 

प्रतिनिधी/ मडगाव

सोनसडो यार्डात जमा झालेल्या कचऱयाच्या ढिगांपैकी 50 टक्के पावसाळय़ापूर्वी हटविले जातील, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. येथील कचऱयाचे ढीग हटविण्यासाठी आणखी एक स्क्रिनिंग मशिन पंधरवडाभरात बसविले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सध्या येथे एक स्क्रिनिंग मशिन बसविण्यात आले असून ताशी 40 टन कचरा वेगळा करण्याची क्षमता या यंत्रात आहे. यार्डात दोन यंत्रे वापरात आणली गेल्यास दिवसाकाठी सुमारे 100 टन कचऱयावर प्रक्रिया करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे महिनाभरात 20 ते 25 हजार टन कचरा कमी करणे शक्य होणार आहे. पावसाळय़ापूर्वी दीड महिने काम करायला मिळाल्यास अर्धे सोनसडो यार्ड कचरामुक्त होणार असून हेच आपले व आपल्या सरकारचे ध्येय आहे, असे सरदेसाई यांनी पुढे बोलताना सांगितले.

पावसाळय़ानंतर प्रसंगी तीन स्क्रिनिंग यंत्रे बसवून कचऱयाचे ढीग हटविण्याचे काम अधिक जोमाने राबविण्यात येईल, असे सरदेसाई यांनी सांगितले. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार काम करणारे असून सोनसडय़ावरील सध्याच्या कामाची विरोधी पक्षातील आमदारांकडूनही स्तुती होत आहे. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही या कामाबाबत स्तुती केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

स्क्रिनिंगनंतर जमा होणारे खत उद्यान, वाहतूक बेट आदी ठिकाणी उपयोगात आणले जाणार असून दगड व अन्य कचरा सखल भाग बुजविण्यासाठी वापरात आणला जाईल. प्लास्टिक साठवून ज्यांच्याकडे करार करण्यात आला आहे त्या गोव्याबाहेरील कंपनीला ते पाठवून दिले जाईल, अशी माहिती सरदेसाई यांनी यावेळी दिली.

सोनसडय़ावरील कचऱयाच्या ढिगांवर प्रक्रिया करण्याच्या कामास अधिकृतपणे मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी कुडतरीचे आमदार लॉरेन्स, मडगावच्या नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई, मुख्याधिकारी यशवंत तावडे, नगरसेवक टिटो कार्दोज व इतर हजर होते. सरकारला खर्चाच्या बाबतीत लक्ष द्यावे लागेल. कारण तो जरा जास्त आहे, असा दावा लॉरेन्स यांनी याप्रसंगी केला.

Related posts: