|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ठेकेदाराने पैसे दिल्याच्या आरोपावरुन नगरसेवक आक्रमक

ठेकेदाराने पैसे दिल्याच्या आरोपावरुन नगरसेवक आक्रमक 

कुडाळ : कुडाळ शहरात रिलायन्स जिओ केबल टाकण्याच्या प्रकरणात सर्व नगरसेवकांना ठेकेदाराने प्रत्येकी दोन-दोन लाख रु. दिल्याच्या आरोपावरुन कुडाळ नगरपंचायतीची बुधवारी झालेली विशेष सर्वसाधारण सभा गाजली.

सर्वच नगरसेवक आक्रमक झाले. आरोप करणारा ठेकेदार व संबंधित इसमावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करा. एवढेच नव्हे, तर ठेकेदाराला येथे बोलावून घेत पैसे कोणाला दिले, याचा जाब विचारा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. ठेकेदाराला बोलाविण्यात आले. मात्र, तो न. पं. कडे फिरकलाच नाही. उपस्थित नगरसेवकांनी आपणास कोणीही पैसे दिले नाहीत, असे सांगत केलेल्या आरोपांचा इन्कार केला. दरम्यान, शहरातील मंजूर रस्त्यांच्या कामांच्या चिंतामणी प्रोजेक्ट प्रा. लि. (अलिबाग) या ठेकेदाराने कमी दराने निविदा भरल्या. त्या निविदा एकमताने नामंजूर करण्यात आल्या. उर्वरित रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र, जिओ केबलच्या आरोपाच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी नगरसेवक जवळ आल्याचे दिसले.

ही सभा नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या अध्यक्षतेखाली न. पं. च्या सभागृहात आज झाली. मुख्याधिकारी देवानंद ढेकळे व नगरसेवक उपस्थित होते. ढेकळे यांनी काही प्रश्नांवर सडेतोड मते मांडत निर्णय घेतल्याने प्रशासनाला गती मिळेल, असे आशावादी चित्र दिसून आले.

जिओ केबलविषयी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर विरोधी शिवसेना सदस्यांनी वृत्तपत्रांत नगरसेवकांना प्रत्येकी दोन-दोन लाख रु. दिल्याचा आरोप झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, याकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधत संबंधित ठेकेदाराने कोणाला पैसे दिले हे सांगावे. त्याला बोलावून घ्या, असे सांगत आपण दुसऱया दिवशी खुलासा का केला नाही? न. पं. च्यावतीने कायदेतज्ञ नेमून संबंधित ठेकेदार व तेथे उपस्थित राहून आरोप करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. या मागणीत सत्ताधाऱयांनीही सूर मिसळून कारवाईची मागणी केली. मेघा सुकी, उषा आठल्ये, प्रज्ञा राणे, श्रेया गवंडे, गणेश भोगटे, बाळा वेंगुर्लेकर, देवानंद काळप यांच्यासह संध्या तेर्से व सत्ताधाऱयांनीही मागणी लावून धरली. संबंधित ठेकेदाराला दूरध्वनी करून येथे बोलाविण्यात आले असून त्याच्याकडून याबाबत खुलासा घेण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

आपण नगरसेवक आहात. आपले प्रत्येक विधान लोक त्याच नजरेतून पाहतात, असे ढेकळे यांनी सांगितले. जिओ केबल टाकण्याची निविदा प्रक्रिया झाली नाही. झालेले नुकसान भरपाई म्हणून ठेकेदाराकडून पैसे भरुन घेतल्याचे त्यांनी सांगितले. जर खोदाईनंतर देखभालीसाठी पैसे भरुन घेतले, तर ज्या रस्त्यावर खोदाई केली आहे. त्या रस्त्यांची तात्काळ डागडुजी करायला हवी, असे अश्विनी गावडे यांनी सांगून तशी मागणी केली.

               केबल टाकण्याची परवानगीच रद्द करा

ठेकेदाराने केलेले आरोप गंभीर आहेत, असे ओंकार तेली यांनी सांगत जिओला दिलेली परवानगी रद्द करा व न. पं. ने भरुन घेतलेले पैसे परत करा, असे सांगितले. मात्र, गणेश भोगटे यांनी विरोध करून आता मंजुरी रद्द करू नका. पैसे मिळाले नाहीत, म्हणून मंजुरी रद्द केल्याचा आरोप लोक करतील, असे सांगितले. मात्र, ठेकेदारावर कारवाई केलीच पाहिजे, असा आग्रह धरला.

              ठेकेदार न आल्यास केबल काढणार

ठेकेदाराने जर प्रत्येकी दोन लाख रु. नगरसेवकांना दिल्याचे सांगितले असेल, तर हा आरोप गंभीर आहे. ठेकेदाराने न. पं. तीत येऊन कोणास पैसे दिले असतील, तर तसे येऊन सांगावे. तो आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथे आला नाही, तर घातलेल्या केबल आम्ही काढून टाकणार, असा इशारा संध्या तेर्से यांनी दिला. यावर वकिलामार्फत संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊया, असे राणे यांनी सांगितले.

             ठेकेदार येणार कसा? त्याला कोणीतरी मारले

ठेकेदाराला येथे बोलावून घ्या, असे नगरसेवकांनी वारंवार सांगितल्यानंतर ठेकेदाराला   कोणीतरी मारले. तो कसा येणार, असे नगराध्यक्ष राणे यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी त्याच्याशी सभेतून दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता, मला रुममध्ये घालून मारले. त्यामुळे आपण येणार नाही, असे ठेकेदाराने सांगितल्याचे राणे म्हणाले. त्यामुळे जिओ केबल टाकणाऱया ठेकेदाराला कोणी मारले? नगरसेवक, त्यांचे नातेवाईक, राजकीय नेते की, नागरिकांनी हा विषय गुलदस्त्यातच राहिला. एजाज नाईक यांनी ठेकेदाराला मारहाण झाली असेल, तर त्याने पोलिसांत तक्रार द्यायला हवी, असे सांगितले. दरम्यान, पोटठेकेदार रुपेश बिडये यांना बोलाविल्याने ते सभेत आले. आपण कोणालाही पैसे दिले नाहीत व तसे कोणालाही सांगितले नसल्याचे ते म्हणाले. मात्र, याच बिडये यांनी त्या घटनेच्या वेळी आपला याच्याशी काही संबंध नाही, असे नगरसेवक गणेश भोगटे यांना सांगितले होते. त्यामुळे भोगटे यांनी त्याला आक्षेप घेत ठेकेदारच आला पाहिजे. मग सगळा उलगडा होईल, असे सांगितले.

                      नाटय़गृहासाठी ठराव

कुडाळ येथे नाटय़गृह उभारण्यासाठी न. पं. च्यावतीने प्रस्ताव करून जिल्हाधिकारी यांना पाठविण्याचा ठराव सभेत करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्याकडील तसे पत्र न. पं. ला प्राप्त झाले होते. सुमारे पाच कोटींचा हा प्रकल्प असून पाच टक्के रक्कम न. पं. ने भरायची आहे. त्याला संमती देण्यात आली. मात्र, नाटय़गृहासाठी जिल्हाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना करण्यात आली. तसेच त्यासाठी पार्किंग व्यवस्था असावी, असे सांगण्यात आले.

               ती जागा लायन्स क्लबला दिली

कुडाळ पोलीस ठाण्यासमोर सावंतवाडी मार्गाला लागून जी जागा आहे. तिथे मिनी भाजी व फळमार्केट सुरू करावे, असे प्रज्ञा राणे यांनी सुचविले असता, ती जागा लायन्स क्लबला उद्यानासाठी ठरावाने दिल्याचे नगराध्यक्षांनी सांगून लायन्सने तात्काळ काम करावे, असे सांगितले.

        मुख्य रस्त्यावरील भाजी-फळ विक्रेत्यांना उठविणार

मुख्य रस्त्यावर कुडाळ हायस्कूल ते आंबेडकर पुतळा या दरम्यान बसणाऱया भाजी-फळ विक्रेत्यांना उठविण्याचा निर्णय घेऊन त्यांना न. पं. समोर तसेच भाजी मार्केट व शॉपिंग सेंटर येथे बसवावे. तसेच त्यांना तेथे पाणी, स्वच्छतागृहाची सोय करून द्यावी, असे सांगण्यात आले. कुडाळ हायस्कूलसह शाळा भरताना व सुटताना डंपरना कुडाळ शहरातून वाहतूक करण्यास बंदी घालावी. तसे पत्र पोलिसांना देण्याचे ठरविण्यात आले. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात गटारावरील दुकानांवर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.

                     जिल्हाधिकाऱयांचे आदेश

शहरातील मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. हा रस्ता ताब्यात घेण्यासाठी न. पं. ने पत्रव्यवहार केला होता. याबाबत झालेल्या बैठकीत रस्ता ताब्यात देण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली. मात्र, त्यावेळी पालकमंत्र्यांनी रस्ता ताब्यात दिला, तरी तो करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणार नाही, असे सांगितले. बांधकामकडेच रस्ता राहूदे, असे सांगितल्याचे ढेकळे यांनी सांगितले. या रस्त्याची मोजणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. मोजणी झाल्यानंतर अतिक्रमणे काढण्यात येतील, असे ते म्हणाले. दरम्यान, राणे यांनी बांधकाम विभागाला रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत पत्र देण्याच्या सूचना ढेकळे यांना दिल्या.

              मच्छीमार्केटमध्ये पाणी व मंडप व्यवस्था करा

 मच्छीमार्केटमध्ये पाण्याची तसेच मंडप व्यवस्था तात्काळ करावी. प्रत्येक विक्रेत्याला एक-दोनच टब ठेवण्यास परवानगी द्यावी. इमारतीमधील सामान हटवावे. तसेच शौचालय-बाथरुमच्या व्यवस्थेबाबत विचार करावा, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या.

 एसटी बसस्थानक परिसरात व अन्यत्र बसणाऱया मासे विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरले. पानबाजार येथील शॉपिंग संकुलात दारु, जुगार याशिवाय शौचालय म्हणून वापर केला जातो. त्यामुळे इमारत निर्लेखित करा, प्लास्टीक पिशवी बंदी गांभीर्याने घ्या, दंडात्मक कारवाई करा, गटारातील सांडपाण्याचा बंदोबस्त करा, कर्मचाऱयांनी नगरसेवक व लोकांशी सौजन्याने आणि आदराने वागावे, नव्याने पथदीपांसाठी प्रस्ताव, विवाह नोंदणी, भंगसाळ नदीच्या काठावर होणारी अस्वच्छता, मस्जिद मोहल्ला परिसरात परमीट रुम, बारना परवानगी देऊ नये आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

                     नागरिकांच्या अभिनंदनाचा ठराव

 कचरा संकलन प्रकरणी नागरिकांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल ओंकार तेली यांनी नागरिकांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला सर्वांनी अनुमती दिली. कर्मचाऱयांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, असे सांगण्यात आले. दरम्यान, कचरा प्रकल्पासाठी आलेल्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. जागा घेतल्यानंतर मशिनरी उभी केल्याशिवाय कचरा तेथे जाता नये, अशी सूचना तेली यांनी केली. कचरा आधी नेला, तर नगरसेवकच विरोध करू, असे सांगण्यात आले.

 जिल्हा नगोरात्थान योजनेंतर्गत दहा रस्त्यांच्या कामांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. पैकी चिंतामणी प्रोजेक्ट प्रा. लि. (अलिबाग) या कंपनीच्या निविदा नामंजूर करण्यात आल्या. या ठेकेदार कंपनीचा प्लांट जिल्हय़ात नाही. हॉटमिक्स मटेरिअल दीड तासाच्या आत जागेवर आले पाहिजे. त्यामुळे काम चांगल्या दर्जाचे होणार नाही, असे नगराध्यक्ष राणे यांनी सांगून या कंपनीस काम देण्यास विरोध केला. त्याला सत्ताधारी व विरोधी सदस्यांनीही अनुमती दर्शविली. अन्य कामाला मंजुरी देण्यात आली. अन्य कामांच्या व या नामंजूर कामाच्या निविदा नव्याने काढण्यात येतील, असे ढेकळे यांनी सांगितले.