|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » साडेसात महिन्यांच्या उपचारानंतर विष्णू वाघ यांचे गोव्यात आगमन

साडेसात महिन्यांच्या उपचारानंतर विष्णू वाघ यांचे गोव्यात आगमन 

प्रतिनिधी/ वास्को

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि माजी आमदार विष्णू सुर्या वाघ साडेसात महिन्यांच्या मुंबईतील उपचारानंतर बुधवारी दुपारी घरी परतले. त्यांच्या तब्येतीत बऱयापैकी सुधारणा झालेली असून सोबतीला डॉक्टर, परिचारीका किंवा कोणत्याही वैद्यकीय सेवेचा आधार न घेता हवाईमार्गे त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

15 ऑगस्ट 2016 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास हृदविकाराच्या झटक्यामुळे विष्णू वाघ यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर दि. 18 ऑगस्टच्या संध्याकाळी वाघ यांना अत्यवस्थ स्थितीत हवाईमार्गे मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. हिंदुजामधील उपचारानंतर त्यांना मुंबईतील कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे साडेतीन महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना पुन्हा हिंदुजामध्ये दाखल करण्यात आले. या काळात त्यांच्या तब्येतील सुधारणा होत गेली. तब्बल साडेसात महिन्यांच्या उपचारानंतर मुंबईहून त्यांना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास गोव्यात आणण्यात आले. उपचाराअंती आलेल्या अशक्तपणामुळे त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, ते आता पूर्ण बरे झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. आता त्यांचे वास्तव्य बांबोळीतील निवासस्थानी असून त्यांच्या भेटीसाठी हिंतचिंतकांनी मोठय़ा संख्येने निवासस्थानी भेट दिली. मात्र, त्यांना विष्णू वाघांना भेटता आले नाही. कुटुंबियांनीच लोकांना तब्येतीची माहिती दिली. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसा अधिक लोकांना भेटू न देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे.

मुंबईतील उपचारांच्या काळात डॉक्टरांसह अनेकांचे सहकार्य लाभले. गोव्याकडे परत येताना मुंबई विमानतळावर तसेच गोव्यात दाबोळी विमानतळावरही पोलीस व इतरांचे सहकार्य लाभल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना केलेल्या सर्वांचे विष्णू वाघ यांनी आभार मानल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

Related posts: