|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » टोयोटाकडून 23 हजार कारचे रिकॉल

टोयोटाकडून 23 हजार कारचे रिकॉल 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था:
टोयोटा किर्लोस्कर मोटारने भारतात विक्री करण्यात आलेल्या सेडान कार प्रकारातील कोरोला अल्टिस कारच्या 23,157 युनिट्स रिकॉल केल्या आहेत. या कारमध्ये सदोष एअरबँग्स् असल्याचे आढळल्याने कंपनीने कार परत मागविल्या आहेत. कंपनीने आंतरराष्ट्रीय पातळीवरून 29 लाख वाहने रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे.
टोयोटा या जपानी ऑटोमोबाईल कंपनीने जपान, चीन आणि अन्य प्रांतातून साधारण 29 लाख कार रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. या रिकॉलमध्ये कोरोला एक्सिओ सेडान आणि आरएव्ही 4एसयूव्ही क्रॉसओव्हर यांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून कार रिकॉल करण्यात आल्यानंतर भारतात विक्री करण्यात आलेल्या कारही परत बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. विक्री करण्यात आलेल्या कारच्या एअरबॅग इनफ्लॅटर्स सदोष असल्याचा संशय असल्याने हे पाऊल उचलण्यात आले.
गेल्या काही वर्षात कार रिकॉल करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. अनेकदा एअरबॅगमध्ये गडबडी असल्याचे समोर आल्याने अनेक कंपन्यांनी कार रिकॉल केल्या आहेत. या कारमध्ये वापरण्यात आलेल्या एअरबॅग्ज्स जपानी कंपनी टकाटा कॉर्पने तयार केल्या आहेत. होंडा, फोर्ड, निस्सान, बीएमडब्ल्यू, मित्सुबिशी आणि टोयोटा कार कंपन्यांमध्ये वापरण्यात आलेल्या एअरबॅग सदोष असल्याचे आढळले आहे.