|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा » फिफा मानांकनात ब्राझील अग्रस्थानी

फिफा मानांकनात ब्राझील अग्रस्थानी 

वृत्तसंस्था /झुरिच :

गुरूवारी घोषित करण्यात आलेल्या फिफाच्या ताज्या मानांकन यादीत पाचवेळा विश्वकरंडक स्पर्धा जिंकणाऱया ब्राझीलला तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा पहिले स्थान मिळाले आहे.

गेल्या वर्षी ब्राझील फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी डुंगाची नियुक्ती करण्यात आली होती. डुंगाच्या मार्गदर्शनाखाली एकेकाळी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात बलाढय़ समजल्या जाणाऱया ब्राझीलने अलिकडच्या कालावधीत 9 सामने जिंकले आहेत. त्यामध्ये आगामी विश्वकरंडक फुटबॉल पात्र फेरीतील आठ सामन्यांचा समावेश आहे. गेल्या मार्चमध्ये ब्राझीलने उरूग्वेचा 4-1 असा पराभव केला. त्यानंतर ब्राझीलने पराग्वेवर 3-0 असा विजय मिळवित रशियामध्ये होणाऱया आगामी फिफाच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी सर्व प्रथम आपली पात्रता सिद्ध केली. ब्राझीलचे अद्याप पात्र फेरीतील चार सामने बाकी आहेत.

फिफाच्या ताज्या मानांकन यादीत ब्राझीलने यापूर्वी आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला मागे टाकत पहिल्या स्थानावर कब्जा केला. गेल्या आठवडय़ात बोलिव्हिया येथे झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाला बोलिव्हियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागल्याने त्यांना फिफाच्या मानांकनातील आपले आघाडीचे स्थान गमवावे लागले. 2018 च्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता अर्जेंटिनाला झगडावे लागत आहे.

गुरूवारी फिफाकडून घोषित करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत ब्राझील पहिल्या स्थानावर, अर्जेंटिना दुसऱया, जर्मनी तिसऱया, चिली चौथ्या, कोलंबिया पाचव्या, फ्रान्स सहाव्या, बेल्जियम सातव्या, पोर्तुगाल आठव्या, स्वित्झर्लंड नवव्या आणि स्पेन 10 व्या स्थानावर आहेत.