|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » पहिल्या वनडेत विंडीजची बाजी

पहिल्या वनडेत विंडीजची बाजी 

 

वृत्तसंस्था/ गयाना

जेसन मोहम्मद (58 चेंडूत नाबाद 91) शानदार खेळीच्या जोरावर विंडीजने पहिल्या वनडेत पाकिस्तानवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱया पाकला 308 धावांत रोखल्यानंतर विजयासाठीचे आव्हान विंडीजने 49 षटकांत 6 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 58 चेंडूत नाबाद 91 धावांची खेळी साकारणाऱया जेसन मोहम्मदला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघातील दुसरा सामना दि. 9 रोजी होईल.

प्रथम फलंदाजी करणाऱया पाकची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अहमद शेहजाद व कमरान अकमल जोडीने 85 धावांची सलामी दिली. अकमल मात्र अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असताना होल्डरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 48 चेंडूत 47 धावा फटकावल्या. शेहजादने अर्धशतक झळकावताना 83 चेंडूत 6 चौकारासह 67 धावा जमवल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला बाबर आझम (13) स्वस्तात बाद झाला. यानंतर, मोहम्मद हाफीज व शोएब मलिकने पाचव्या गडय़ासाठी 89 धावांची भागीदारी करत संघाला पावणे तीनशेपर्यंत मजल मारुन दिली. हाफीजने शानदार खेळी साकारताना 92 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह 88 धावा फटकावल्या. मलिकने 53 धावा करत त्याला चांगली साथ दिली. सरफराज अहमदने नाबाद 20 धावांचे योगदान दिले. यामुळे पाकला निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावत 308 धावापर्यंत मजल मारुन दिली. विंडीजतर्फे ऍश्ले नर्सने 4 तर जेसॉन होल्डरने 1 गडी बाद केला.

प्रत्युतरादाखल खेळणाऱया विंडीजन संघाने विजयासाठीचे 309 धावांचे आव्हान 49 षटकांत 6 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत शानदार विजय मिळवला. सलामीवीर एडविक वॉल्टन 7 धावा काढून बाद झाला. एविन लेविसने 47 धावा फटकावल्या. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर केरॉन पॉवलेने दमदार अर्धशतक झळकावताना 86 चेंडूत 5 चौकारासह 51 धावा जमवल्या. पॉवेल बाद झाल्यानंतर जेसन मोहम्मदने पाक गोलंदाजाची चांगलीच धुलाई करताना 58 चेंडूत 11 चौकार व 3 षटकारासह नाबाद 91 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला ऍश्ले नर्स (15 चेंडूत नाबाद 34), जोनाथन कार्टर (14) यांनी चांगली साथ दिली. पाकतर्फे मोहम्मद अमीर व शादाब खानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 50 षटकांत 5 बाद 308 (अहमद शेहजाद 67, कमरान अकमल 47, मोहम्मद हाफीज 88, शोएब मलिक 53, ऍश्ले नर्स 4/62), वेस्ट इंडिज 49 षटकांत 6 बाद 309 (एविन लेविस 47, केरॉन पॉवेल 61, शेई होप 24, जेसॉन मोहम्मद नाबाद 91, ऍश्ले नर्स नाबाद 34, मोहम्मद आमीर 2/59, शादाब खान 2/52).