|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आधी लगीन पाण्याचं, मग आमच्या लेकीचं.!

आधी लगीन पाण्याचं, मग आमच्या लेकीचं.! 

विशाल कदम/ सातारा

गतवर्षी पाणी फौंडेशनने आयोजित केलेल्या ‘वॉटर कप स्पर्धेत’ कोरेगाव तालुक्यातील सुमारे 30 गावांनी सहभाग नोंदवला आणि बक्षिसही पटकावले. यावर्षीच्या स्पर्धेला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्दने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहे.

रविवारी याच गावातल्या लेकीचा विवाह गावातच तांदूळवाडीतील वराशी झाला. हा लग्नसोहळा अनोखाच होता. लेकीच्या विवाहा अगोदर व गावात येणाऱया सुनेच्या गावासाठी वराडीमंडळींनी आधी लगीनं पाण्याचं, मग आमच्या लेकीचं, असं म्हणत, हातात टीकाव, खोरं, घमेल घवून तब्बल तासभर श्रमदान केलं. मंडळी दत्त मंदिराजवळील सीसीटीचे 60 मीटर काम केले. त्यानंतर वधूवरांवर अक्षता पडल्या.

चित्रपट अभिनेता अमिर खान व त्यांची पत्नी किरण राव यांच्या पाणी फौंडेशन या संस्थेने दुष्काळी गावांसाठी वॉटर कप स्पर्धा याही वर्षी आयोजित केली आहे. यामध्ये सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द सहभागी झाले आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्याची आभाळ, दिवाळीनंतर टॅंकरवर अवलंबून रहावे लागते. जांब खुर्द या गावची लोकसंख्या 1009 असून गावांमध्ये 560 गुरं आहेत. यावर्षी या गावाने कसल्याही परिस्थितीत वॉटर कपमध्ये पहिलं बक्षिस मिळवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी दररोज गावात बैठका सुरू आहेत.प्रत्यक्ष स्पर्धेला दोन दिवसापासून सुरुवात झाली अन् ग्रामस्थांनीही श्रमदानाला सुरुवात केली. हे सुरु असतानाच गावातील निंबाळकर यांच्यातील ज्योती हिचा विवाह तांदूळवाडी येथील दिनेश याच्याशी ठरला. तो विवाहसोहळा जांबमध्ये घेण्याचे नियोजन झाले. मात्र, गाव पाणीदार करण्यासाठी लेकीनंच माझ्या गावांसाठी श्रमदान करण्याचा मनोदय व्यक्त केला. लग्नापूर्वी श्रमदान करण्याची संकल्पना सर्वांनाच पटली. तांदूळवाडीतील वराडी मंडळी लगीनघरी पोहचली. लग्नांची गडबड सुरु असताना श्रमदान करण्याचं कोणीही विसरुन गेलं नाही.

नवरानवरीला हळदी लावल्यानंतर नवरी ज्योती आणि नवरा दिनेश या दोघांसह वऱहाडीमंडळी श्रमदानाना दुपारी दोन वाजता दत्त मंदिराजवळ पोहचले. पहिलं टीकाव वराने सासरवाडीला पाणीदार करण्यासाठी मारलं. मग बघता बघता तासाभरात वऱहाडी मंडळींनी 60 मीटरचा सीसीटी तयार केला. भर उन्हात हे काम करुन साडेतीनच्या दरम्यान वधूवरासह वऱहाडी मंडळी लग्नमंडपाकडे आली. गावांतून श्रीवंदन झाल्यानंतर विधीवत पद्दतीने वधूवर विवाहबंधनात अडकले.

समन्वयकांनी बजावली महत्वाची भूमिका

पाणीदार गाव करण्यासाठी पाणी फौंडेशनचे कोरेगाव तालुका समन्वयक मोहन लाड, सुरेखा फाळके, एस.एस. पवार, राहुल बासल यांनी गावात एकीची मोट बांधली असून पाण्याचे महत्व पटवून देत श्रमदानानेच आपल्याला पाणी मिळेल असे मार्गदर्शन करत आहेत. जलसंधारणाचे काम गावामध्ये केल्यास तब्बल पावसाचे वाया जाणारे 400 कोटी लिटर पाणी अडवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गाव पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Related posts: