|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा बाजारपेठेच्या विकासासाठी 20 कोटी रुपये राखीव : मुख्यमंत्री

म्हापसा बाजारपेठेच्या विकासासाठी 20 कोटी रुपये राखीव : मुख्यमंत्री 

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा मार्केटसाठी पैसे नाही हा विषय नाही तर म्हापसा पालिका चालविणाऱयांनी म्हापसा मार्केटचे पावित्र्य टिकवून ठेवण्याची आज गरज आहे. म्हापसा मार्केटमध्ये बेकायदेशीर धंदे करण्यास देणार नाही. लोकांची विकासकामे करीत असताना सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जाण्याची इच्छा मनी बाळगली तर मार्केट उत्कृष्ट स्थितीत येण्यास उशीर लागणार नाही. म्हापसा मार्केटच्या विकासासाठी 20 कोटी रुपये राखीव ठेवले असून हे पैसे मार्केटच्या प्रकल्पासाठीच वापरात आणावे. दुसऱया कामासाठी अधिक पैसे देऊया. म्हापसा मार्केट चांगल्या दिशेने वाटचाल सुरुवात होणार असून चांगले सेवा देणारे मार्केट होण्यास आम्ही लक्ष देऊया. येत्या पंधरा दिवसाची मुदत द्या. टास्क फॉस स्थापन करून म्हापशाचे सर्व प्रश्न आम्ही सोडवूया असे ठोस आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हापसावासीयांना दिले.

म्हापसा व्यापारी संघटना स्थापन होऊन आज 32 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त संस्थापन दिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याहस्ते समईदीप प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले.. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष संदीप फळारी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, उपाध्यक्ष नरेश तिवरेकर, श्रीपाद येंडे, फोंडू सावंत, पीटर मास्केरान्हास, गीतेश डांगी, पांडुरंग सावंत, उपनगराध्यक्ष मर्लीन डिसोझा, राजेंद्र पेडणेकर, रुपेश शिंदे, कमलाकांत परब, नीलेश परब, नगरसेवक तुषार टोपले, सुधीर कांदोळकर, मधुमीता नार्वेकर, ऍनी आल्फान्सो, शेखर बेनकर, स्वप्नील शिरोडकर, अल्पा भाईडकर, दिप्ती लांजेकर, विभा साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

खाण समस्यामुळे म्हापशाच्या विकासाकडे दुर्लक्ष

खाण समस्या व न्यायालयातील धावपळीमुळे म्हापशाच्या विकासाकडे थोडे दुर्लक्ष झाले. या सर्व गोष्टीवर येत्या 15 दिवसात तोडगा काढणार, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. म्हापशात मलनिस्सारण प्रकल्प सहा महिन्यात पूर्ण करण्याकडे आपण लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related posts: