|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » काजू खरेदीचा यापुढे सर्वानुमते एकच दर!

काजू खरेदीचा यापुढे सर्वानुमते एकच दर! 

कणकवली : काजू बी खरेदीच्या दरावरून व्यापारी, कारखानदार व बाजार समिती यांच्यात संवादाने तोडगा निघण्याची गरज आहे. व्यापारात स्पर्धा करताना त्यात शेतकऱयांचा फायदा पाहत असताना व्यापारी व कारखानदार यांच्यातील कोणाचेही नुकसान होता नये, याची काळजी घेतली जाईल. पुढच्या आठवडय़ापासून जिल्हय़ात काजू खरेदीचा सर्वानुमते एकच दर निश्चित केला जाईल. त्यानुसारच व्यापाऱयांनी काजू खरेदी करावा. कारखानदारांनी व्यापाऱयांकडून पाच रुपये मार्जीननुसार काजू खरेदी करावा, असा तोडगा अखेर गेले दोन दिवस सुरू असलेल्या या वादावर आमदार नीतेश राणे यांनी काढला.

काजू बी खरेदी दरावरून गेले दोन दिवस कारखानदार, व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणे यांनी या सर्व पदाधिकारी व व्यापाऱयांची येथील विश्रामगृहावर बैठक आयोजित केली होती. यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपीन वरसकर, खजिनदार सुधीर झांटय़े, राजन परब, प्रकाश राणे, संतोष राणे, विजय हळदिवे, जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव महेश नार्वेकर, जगन्नाथ उर्फ बाबू वळंजू, नवीन बांदेकर आदी उपस्थित होते.

वळंजू यांनी व्यापाऱयांतर्फे बाजू मांडताना शेतकऱयांच्या हिताच्यादृष्टीने सुरुवातीला 160 रुपयांपर्यंत काजू बीला दर देण्यात आला. मात्र, या दरानुसार कारखानदारांनी काजू खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे एका ट्रक मागे व्यापाऱयांचा सरासरी एक ते दोन लाखाचा तोटा होऊ लागला. हा तोटा भरून काढण्यासाठी काजूचा दर खाली 120 रुपयांपर्यंत आणावा लागला. मात्र, याच वेळी जिल्हा बँक, बाजार समितीने कारखानदारांच्या माध्यमातून 140 रुपये दर देत व्यापाऱयांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या वादाला सुरुवात येथेच झाली असून आम्हाला वाद करायचा नाही मात्र बाजार समितीने यावर तोडगा काढावा  व त्यासाठी आमचे सहकार्य असेल, असे त्यांनी सांगितले.

यावर कारखानदारांची बाजू मांडताना बोवलेकर यांनी व्यापाऱयांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. व्यापारी 50 पैसे ते 3 रुपयांपर्यंत मार्जीन ठेवून आम्हाला काजू विकत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन आठवडे दर 120 रुपयांवर आला असताना व्यापाऱयांना एका ट्रक मागे पाच ते सात लाख रुपये उत्पन्न मिळू लागले. मात्र, यात शेतकरी भरडला जाऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. थेट काजू खरेदी करणे हा आमचा व्यवसाय नाही मात्र शेतकऱयांच्या हिताच्यादृष्टीने जिल्हा बँक व बाजार समिती पुढे आल्याने आम्ही स्टॉल लावल्याचे त्यांनी सांगितले. बांदा, दोडामार्ग येथे कारखानदारांच्या अंगावर धावून येण्याचे प्रकार घडले. या गोष्टी चुकीच्या असून व्यापाऱयांनी तीन रुपये मार्जीन ठेवून काजू शेतकऱयांकडून स्वीकारावा, तो आम्ही निश्चित त्यांच्याकडून घेऊ, असे सांगितले.

कारखानदार व काजू व्यापारी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे राणे यांनी या विषयात हस्तक्षेप करीत आपण वाद सोडवायला बसलो आहोत. स्पर्धा नको, तर तोडगा काढा, अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या.  झांटय़े यांनी मांडलेल्या 3 टक्के मार्जिनच्या मुद्याला वळंजू, नार्वेकर व रुपेश खाडय़े यांनी आक्षेप घेत माल हाताळणी, वाहतूक खर्च, सबडिलरचे कमिशन हे सर्व पाहता, मार्जिन वाढविण्याची मागणी केली. त्यावर तोडगा काढत राणे यांनी व्यापाऱयांना कारखानदारांनी 5 रुपये मार्जिन देण्याचा तोडगा काढला. त्याला कारखानदारांनी मान्यता दर्शविली. मात्र, याच वेळी काहींनी या तोडग्यावर साशंकता व्यक्त केली. मात्र, राणे यांनी हस्तक्षेप करीत मार्जिनचा विषय मिटला असून वाद वाढवू नका, असे स्पष्ट केले.

बोवलेकर व झांटय़े यांनी मंगळवारच्या बाजारात बाजार समितीने 140 रुपयाने काजू घेतला. त्यामुळे या दरापेक्षा 5 रुपये अधिक देऊन आम्ही माल खरेदी  करतो. व्यापाऱयांनी आम्हाला पाच लोड काजू बी देण्याची सूचना केली. त्याला काजू व्यापाऱयांनी प्रतिसाद देण्याचे मान्य केले. काजू खरेदीसाठी गोवा बागायतदार संघ जो दर निश्चित करेल, त्यानुसार दोडामार्ग व बांदा येथे काजू बी खरेदी करण्यात येईल व त्या दराच्या पाच रुपये दर कणकवलीत कमी असेल, या मुद्यावर बैठकीत एकमत करण्यात आले.

Related posts: