|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » अवघ्या 4 चेंडूत बहाल केल्या 92 धावा!

अवघ्या 4 चेंडूत बहाल केल्या 92 धावा! 

वृत्तसंस्था / ढाका

खराब पंचगिरीच्या निषेधार्थ सामना कोणत्याही परिस्थितीत हरायचाच, असा जगावेगळा निर्धार करणाऱया बांगलादेशमधील एका क्लब संघाने अवघ्या 4 चेंडूत 92 धावा बहाल करण्याचा मुलखावेगळा प्रताप केला आणि जागतिक क्रिकेट वर्तुळाच्या भुवया वर उंचावल्याशिवाय राहिल्या नाहीत. ढाका सेकंड डीव्हीजन लीगमधील 50 षटकांच्या लढतीत लाल्मातिया क्लबचा डाव 14 षटकात 88 धावांमध्येच खुर्दा झाला तर प्रतिस्पर्धी ऍक्झिओम क्रिकेटर्स संघाने केवळ 4 चेंडूत 92 धावा ‘केल्या’.

लाल्मातियाचा सलामी गोलंदाज सुजोन महमूदने पहिल्याच षटकात तब्बल 13 वाईड व 3 नोबॉल टाकले आणि ते सर्व चेंडू सीमापार पोहोचतील, हे देखील पाहिले. त्यामुळे, अवांतर 16 धावा व चौकारांच्या 64 अशा एकूण 80 धावा ऍक्झिओमच्या खात्यावर नोंदवल्या गेल्या. त्यानंतर ऍक्झिओमचा सलामीवीर मुस्तफिजूर रहमानने 4 ग्राहय़ चेंडूत 3 चौकार फटकावले व अशा रितीने 0.4 षटकातच त्याच्या संघाने 92 धावांची आतषबाजी केली. ढाका येथील सिटी क्लब ग्राऊंडवर हा सामना खेळवला गेला.

‘सामन्यातील खराब पंचगिरीचा निषेध करण्यासाठी आमच्या खेळाडूंनी जाणूनबुजून वाईड व नोबॉल चेंडू टाकले व सामना प्रतिस्पर्ध्याना बहाल केला’, असे लाल्मातिया क्लबचे सचिव अदनान रहमान यांनी यावेळी नमूद केले. ‘पंचांनी नाणेफेकीचा कौल काय आहे, हे आम्हाला पाहू देखील दिले नव्हते’, असा दावा रहमान यांनी यावेळी केला. ‘त्यांनी नाणे उडवले व ते पाहू न देताच आम्हाला म्हणाले, तुम्ही फलंदाजी करु शकता. पुढे 7 षटकात अवघ्या 11 धावात आमचे 5 फलंदाज बाद झाले होते’, असे त्यांनी पुढे सांगितले.

पूर्ण हंगामात स्थानिक पंचांनी लाल्मातिया संघाविरुद्ध सातत्याने अन्यायच केला आहे, असे अन्य एका सूत्राने यावेळी नमूद केले. दरम्यान, या घटनेची बांगलादेश क्रिकेट मंडळाने गांभीर्याने दखल घेतली असून सामनाधिकाऱयांना याबाबत तातडीने आपला अहवाल देण्याचे आदेश जारी केले आहेत.