|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिवभक्तांच्या राँग नंबरने साताऱयाच्या युवकाचा मनस्ताप

शिवभक्तांच्या राँग नंबरने साताऱयाच्या युवकाचा मनस्ताप 

सातारा/ प्रतिनिधी

जाज्वल्य शिवकाळाच्या इतिहासात गेल्या कित्येक पिढय़ा स्वाभिमानाच्या-अभिमानाच्या शिखरावर आहेत. प्रखर शिवभक्ती ही महाराष्ट्राच्या मातीचा अमूल्य ठेवा आहे. मात्र सोशल मीडियावरील सध्याच्या अनियंत्रित वापरामुळे अनेकदा गालबोट लागेल अशा घटना घडत आहेत. साताऱयातील असाच एक युवक मंगळवारी सकाळपासून राज्यभरातील शिवभक्तांच्या त्रागाचा शिकार बनला आहे. सरतेशेवटी संभाव्य धोके लक्षात घेवून इच्छा नसतानाही त्याला पोलिसांत धाव घ्यावी लागली….

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वादन व्हावे की न व्हावे यावरून सोशल मीडियावर वाद सुरू होता. शासनाने नियोजित कार्यक्रम रद्दही केला. परंतु सोमवारी तिथीनुसार छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी होती यावेळी रायगड स्मारक समितीच्या वतीने ढोल वादनाचा कार्यक्रम झाल्याचे सांगितले जाते. यावरून सोशल मीडियावरील तथाकथित शिवभक्तांमध्ये वाद विवाद सुरूच होता. या स्मारक समितीच्या अध्यक्षांकडे आपला ‘अमूक अमूक’ क्रमांकावर आपला निषेध नोंदवा अशी पोस्ट सकाळपासून व्हायरल झाली. गम्मत म्हणजे पोस्टमधील अध्यक्षांचा नंबर चुकला. पोस्टमध्ये लिहिलेला नंबर साताऱयातील युवक असिफ शेख याचा होता. त्यामुळे समितीचे अध्यक्ष समजून या असिफला सायंकाळपर्यंत शेकडो फोन आले. आणि तितकेच वादविवादाचे, कधी लाखोलीचे प्रसंग आले.

शिवकाळाचे अभ्यासक साडेतीनशे वर्षापूर्वीचा पुरावा घासून पुसून घेतल्याशिवाय बोलत नाहीत की लिहित नाहीत. मात्र सोशल मीडियावरील या तथाकथित शिवभक्तांच्या आततायीपणामुळे हा प्रकार घडत होता. त्यामुळेच असिफला पोलीस ठाण्याचा रस्ता धरावा लागला.