|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सरकारचे कर्जमाफीच्या दिशेने पाऊल

सरकारचे कर्जमाफीच्या दिशेने पाऊल 

शेतकऱयांची कर्जमाफी हा काही अंतिम रामबाण उपाय नाही. शेतकऱयांना योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, अशी भूमिका घेणाऱया राज्य सरकारची पावले आता कर्जमाफीच्या दिशेने पडू लागली आहेत. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांचे नेमके किती पीक कर्ज थकीत आहे, याची माहिती घेण्याचे आदेश वित्त विभागाने सहकार खात्याला दिले आहेत. त्यानुसार, सहकार खात्याने पीक कर्जाची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजला. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या सरकारने तेथील शेतकऱयांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. त्याचवेळी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला शेतकऱयांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यातील शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढला होता. कर्जमाफी दिली तर शेतकऱयांच्या आत्महत्या थांबतील का? असा सवाल करीत फडणवीस यांनी कर्जमाफीची मागणी अमान्य केली होती.

तरीही विरोधी पक्षाने अधिवेशनाच्या शेवटपर्यंत कर्जमाफीची मागणी आक्रमकपणे लावून धरली. शिवाय विदर्भ, मराठवाडय़ात संघर्ष यात्रा काढत सरकारच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीच्या युपी मॉडेलचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन विधिमंडळात द्यावे लागले. त्यानुसार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कर्जमाफीचा अभ्यास सुरू केला आहे.

राज्यातील शेतकऱयांना राष्ट्रीयकृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून पीक कर्जपुरवठा केला जातो. शेतकऱयांना खत, बियाणे, पशूधन, औजारे, टॅक्टर खरेदी, पीक विमा, फळबागा, हरित गृह आदींसाठी अल्प आणि मध्यम मुदतीचे कर्ज दिले जाते. बँकांकडून शेतकऱयांना दरवर्षी 30 ते 35 हजार कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले जाते. 2009 पासून बँकांचे जवळपास 30 हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे. या थकीत कर्जामुळे 31 लाख शेतकरी हे संस्थात्मक कर्ज व्यवस्थेतून बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्जमाफी देताना या शेतकऱयांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

 

Related posts: