|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बिबवणेत कारची टेम्पोला धडक

बिबवणेत कारची टेम्पोला धडक 

कुडाळ : बुलढाणा येथून गोवा येथे जाणाऱया सुसाट कारने मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे-मांडकुली थांबा येथे समोरून येणाऱया आयशर टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक गंभीर, तर चार किरकोळ जखमी झाले. कारची धडक एवढी जबरदस्त होती की, आयशरच्या दोन्ही चाकांची एक्सलच तुटली. मोठे नुकसानही झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले.

मूळ बीड येथील करीम बेग कुटुंबियांसह बुलढाणा-चिकली येथून बुधवारी सायंकाळी गोवा येथे भाडय़ाची टाटा व्हिस्टा कार घेऊन निघाले. वाटेत त्यांनी मुक्काम केला. गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ते बिबवणे येथे आले असता, कार चालक रामदास श्यामराव सोळंकी (35) यांचा कारवरील ताबा सुटला व कार विरुद्ध दिशेला जात रस्त्याच्या बाजूला थांबत असणाऱया आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. आयशर टेम्पो चालक गोवा येथे माल उतरवून नांदगाव येथे जात होता.

अपघातानंतर लागलीच स्थानिकांनी ‘108’ ला अपघाताची खबर दिली. त्याने सर्व जखमींना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणले. या अपघातात जौरब्बी सय्यद (40) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या नाकाला मार लागला आहे. चालक रामदास सोळंकी यांच्यासह नसिर बेग (25), मिनद सय्यद (18) व करीम बेग (50) हेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सर्व जखमींना गोमॅकोत हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. पंडित व सहकाऱयांनी जखमींवर तात्काळ उपचार केले. अपघाताची खबर मुबीन उमर नावलेकर (रा. नांदगाव) यांनी पोलिसांत दिली. भादंवि कलम 279, 337, मोटर व्हेईकल ऍक्ट 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.