|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोलीत छुपी दारू विक्री ‘तरुण भारत’ कॅमेऱयात कैद

दापोलीत छुपी दारू विक्री ‘तरुण भारत’ कॅमेऱयात कैद 

प्रतिनिधी /दापोली :

सर्वोच्य न्यायालयाचा आदेश मोडून दापोलीतील फॅमिलीमाळ येथील राज्य महामार्गानजीक एका हॉटेल मालकाकडून सुरू असणारी छुपी दारू विक्री तरुण भारतने उघडकीस आणली आहे. हा विक्रेता दामदुप्पट किमतीने दारूची विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्य न्यायालयाने महामार्गावर होणारे अपघात रोखण्याकरीता राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 220 मिटरच्या आता दारू विक्री करणारी सर्व दुकाने, बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दापोली शहरही राज्य महामार्गावर येत असल्याने या आदेशानंतर दापोली शहर ‘दारू मुक्त’ झाले. तरीदेखील काही महाभाग दापोलीत छुप्या पध्दतीने व चढय़ा भावाने दारू विकत असल्याच्या अनेक तक्रारी सुरू होत्या. मात्र, पोलिसांची सोयीस्कर डोळे झाक सुरू असल्याने सामाजिक जबाबदारीतून वस्तुस्थिती पडताळून पाहीली.

यानुसार माहिती घेतली असता दापोली शहरात फॅमिलीमाळ येथे भरलोकवस्तीत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱया हॉटेलमध्ये चोरून ग्राहकांवर दारूचा ‘वर्षा’व होत असल्याचे निदर्शनास आले. हॉटेलचा मालकच हॉटेलच्या मागील दारात उभा राहून चोरून चढय़ा भावाने दारू विकत असल्याचे निदर्शनास आले. दारू विक्री सुरू असतानाचे चित्रीकरण करण्यात आले.

चोरून दारू विकताना पकडले गेलो आहोत हे निदर्शनास आल्यावर मग हॉटेल मालकांची पाचावर धारण बसली. मग प्रथम गयावया व नंतर आम्ही असे पुन्हा करणार नाही अशी शरणागतीची भाषा सुरू करण्यात आली. दापोली शहर हे सुसंस्कृत व कायदा पाळणाऱया लोकांचे शहर म्हणून परिचित आहे. कायद्याची पायमल्ली करणाऱया या हॉटेल मालकांवर आता संबंधित खाते कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.