|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अंगठा लावा….धान्य घ्या

अंगठा लावा….धान्य घ्या 

प्रतिनिधी / आजरा 

गावोगावी सुरू असलेल्या रास्तभाव स्वस्त धान्य दुकानांमध्ये यापुढे अंगठा लावल्यानंतरच धान्य प्राप्त होणार आहे. तालुक्यातील सर्वच्या सर्व 87 रेशन धान्य दुकानदारांना ई-पॉज मशिनचे वितरण गुरूवार दि. 13 रोजी करण्यात आले. सर्व दुकानदारांना हे मशिन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून 1 मे पासून याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार आहे.

आजवर रेशन कार्डवरील युनिटच्या आधाराने प्रत्येक रेशन दुकानातून धान्य, केरोसीन वाटप केले जात होते. कोणाचीही शिधापत्रिका कोणीही घेऊन दुकानात गेले तरी धान्य मिळत होते. मात्र या मशिनच्या माध्यमातून आता नोंदी करून धान्य दिले जाणार असल्याने रेशनकार्ड धारकांना धान्यसाठी स्वत: दुकानात जावे लागणार आहे. रेशनकार्डवर नाव असलेल्या व्यक्तींपैकी ज्या व्यक्तींचे आधार कार्ड लिंक केले गेले आहे त्यापैकी कोणाही व्यक्तीचा अंगठा मशिनला लावल्याखेरीज त्या कार्डची माहिती उपलब्ध होणार नाही.

रेशनकार्डवर असलेल्या व्यक्तींना किती धान्य अथवा केरोसीन देय आहे याची नेंद थेट मशिनमधून समजणार आहे. तर संबंधित व्यक्तीला धान्य दिल्यानंतर त्याची रक्कम किती देय आहे याची पावती थेट मशिनमधून मिळणार असून याची नोंद तालुका व पुरवठा अधिकारी कार्यालयाला प्राप्त होणार आहे. यामुळे रेशनकार्ड धारकाने धान्य घेऊन पैसे भरताच कोणी व किती धान्य घेतले, त्याची रक्कम किती याची नोंद लागलीच तालुका व जिल्हा कार्यालयात होणार आहे. यामुळे प्रत्येक दुकानात लागणारे धान्य, होणारी उचल आणि शिल्लक साठा याची माहिती वरीष्ठ कार्यालयांकडे लागलीच उपलब्ध होणार आहे. या पद्धतीमुळे रेशन धान्याचा काळा बाजार निश्चितपणे रोखला जाणार आहे. मात्र दुसऱया बाजूला ज्या कुटुंबातील व्यक्ती विभक्त आहेत व त्यांचे रेशन कार्डमात्र एकत्र आहे अशा कुटुंबांची अडचण होणार आहे.

गुरूवारी आजरा तहसीलदार कार्यालयात ई-पॉज मशिन कशी हाताळायची याचे प्रशिक्षण अभियंता वैभव वडगांवकर यांनी दिले. तर प्रत्येक मशिन कार्यान्वीत करून संबंधित रेशन धान्य दुकानदारांकडे वितरीत करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. आनंद देऊळगांवकर, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, पुरवठा अधिकारी आर. एल. तराळ, लिपिक एस. एस. शिंदे यांच्यासह तालुक्यातील सर्वच्या सर्व 87 रेशनधान्य दुकानदार उपस्थित होते.