|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » पोलार्डच्या झंझावातासमोर बद्रीची हॅट्ट्रिक झाकोळली!

पोलार्डच्या झंझावातासमोर बद्रीची हॅट्ट्रिक झाकोळली! 

बलाढय़ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध मुंबई इंडियन्सचा नाटय़मय विजय, पोलार्डची 47 चेंडूत 70 धावांची आतषबाजी निर्णायक

वृत्तसंस्था/ बेंगळूर

विंडीजचा धडाकेबाज फलंदाज केरॉन पोलार्डने सहाव्या स्थानी फलंदाजीला येत अवघ्या 47 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारांसह 70 धावांची आतषबाजी केली आणि आरसीबीच्या हातातोंडातील विजयाचा घास अक्षरशः हिसकावून घेतला. यंदाच्या आयपीएल हंगामातील हा सर्वात सनसनाटी निकाल ठरला असून आरसीबीचा गोलंदाज सॅम्युएल बद्रीची हॅट्ट्रिक देखील पोलार्डच्या खेळीने झाकोळली गेली.

घरच्या मैदानावर खेळणाऱया रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने कर्णधार विराट कोहलीच्या (47 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार) तडफदार अर्धशतकामुळे निर्धारित 20 षटकात 5 बाद 142 धावा जमवल्या तर मुंबईने आघाडी फळी कोसळल्यानंतर देखील निर्धाराने चिवट खेळावर भर देत 18.5 षटकांत 6 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.

वास्तविक, विजयासाठी 143 धावांचे आव्हान असताना मुंबई इंडियन्सची अतिशय खराब सुरुवात झाली होती. पार्थिव पटेल (3), जोस बटलर (2), कर्णधार रोहित शर्मा (0) व मॅकक्लॅघन (0) या आघाडीच्या 4 फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातल्याने 4 बाद 7 अशी दाणादाण उडाली. नितीश राणाही 11 धावांवर तंबूत परतल्यावर 5 बाद 33 अशी मुंबईची केविलवाणी स्थिती झाली होती. पण, यानंतर केरॉन पोलार्डने 30 चेंडूत नाबाद 37 धावांचे योगदान देणाऱया कृणाल पंडय़ासमवेत 6 व्या गडय़ासाठी 93 धावांची दमदार भागीदारी साकारत या सामन्याचा नक्षाच बदलून टाकला.

सॅम्युएल बद्रीची हॅट्ट्रिकही निष्फळ

विंडीजचा गोलंदाज सॅम्युएल बद्रीने डावातील तिसऱयाच षटकात पार्थिव पटेल, मॅकक्लॅघन व रोहित शर्मा यांना सलग 3 चेंडूंवर बाद करत आयपीएल पदार्पणातच हॅट्ट्रिक साजरी करत एकच खळबळ उडवून दिली. पॉवरप्लेमध्येही पटेल व मॅकक्लॅघनला बाद केल्यानंतर बद्रीने रोहित शर्माला गुगलीवर त्रिफळाचीत करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. तो आयपीएलमधील 12 वा हॅट्ट्रिकवीर आहे. आपल्या कोटय़ातील शेवटच्या चेंडूवर राणाला बाद करीत चौथा बळीही मिळविला. या पूर्ण लढतीत त्याचे पृथक्करण 4 षटके, 1 निर्धाव, 9 धावा व 4 बळी, असे लक्षवेधी ठरले. पण, तरीही पोलार्ड व कृणाल पंडय़ाने बेंगळूरच्या विजयाचे सारे मनसुबेच उधळून लावले.

पोलार्डने 16 व्या षटकात पवन नेगीला 2 उत्तुंग षटकार खेचले आणि यशश्री मुंबईच्या आवाक्यात आणून ठेवली. विंडीजचा हा उंचापुरा, धिप्पाड फलंदाज 18 व्या षटकात बाद झाला. पण, तोवर त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. पुढे कृणालने आपलाच भाऊ हार्दिक पंडय़ासह विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हार्दिकने टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर लाँगऑनच्या दिशेने जोरदार षटकार खेचत मुंबईच्या नाटय़मय विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. 10 धावांच्या आत पहिले चार फलंदाज बाद होऊनही सामना जिंकण्याची ही आयपीएलमधील पहिलीच वेळ आहे.

143 धावांचे आव्हान, 5 बाद 33 अशी दैना, तरीही मुंबई विजयी!

येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयासाठी 143 धावांचे आव्हान असताना अवघ्या 8 षटकातच मुंबई इंडियन्सची 5 बाद 33 अशी दाणादाण उडाली होती. बद्रीने आघाडी फळीच कापून काढल्याने मुंबईचा पराभव औपचारिक ठरणार, या शक्यतेने आरसीबीचे चाहतेही सुखावले होते. पण, त्याचवेळी पोलार्डचे वादळ येथे घोंघावत राहिले आणि मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत आतापर्यंतचा सर्वात धमाकेदार विजय नोंदवला.

हंगामातील पदार्पणात विराटचे तडफदार अर्धशतक, पण…

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा कर्णधार विराट कोहलीने या आयपीएल हंगामात शुक्रवारी पदार्पण नोंदवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांची कसोटीत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्यानंतर विराटला प्रदीर्घ काळ मैदानात उतरता आले नव्हते. मुंबईविरुद्ध येथे विराटने सलामीला फलंदाजीला उतरत 47 चेंडूत 62 धावांची खणखणीत खेळी साकारली. यात 5 चौकार व 2 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. विराटने यावेळी गेलसह 9.2 षटकात 63 धावांची सलामी दिली. तसेच, दुसऱया गडय़ासाठी डिव्हिलियर्ससह 6.1 षटकात आणखी 47 धावा जोडल्या. पण, यानंतरही त्याचा करिष्मा आरसीबीचा पराभव टाळू शकला नाही.

धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : ख्रिस गेल झे. पटेल, गो. हार्दिक पंडय़ा 22 (27 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), विराट कोहली झे. बटलर, गो. मॅकक्लॅघन 62 (47 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), एबी डिव्हिलियर्स झे. शर्मा, गो. कृणाल पंडय़ा 19 (21 चेंडूत 1 षटकार), केदार जाधव धावचीत 9 (8 चेंडू), पवन नेगी नाबाद 13 (13 चेंडू), मनदीप सिंग त्रि. गो. मॅकक्लॅघन 0 (1 चेंडू), स्टुअर्ट बिन्नी नाबाद 6 (4 चेंडू). अवांतर 11. एकूण 20 षटकात 5/142.

गडी बाद होण्याचा क्रम – 1-63 (गेल), 2-110 (विराट), 3-115 (डिव्हिलियर्स), 4-127 (जाधव), 5-127 (मनदीप सिंग).

गोलंदाजी : टीम साऊदी 2-0-23-0, हरभजन 4-0-23-0, मॅकक्लॅघन 4-0-20-2, जसप्रीत बुमराह 4-0-39-0, हार्दिक पंडय़ा 2-0-9-1, कृणाल पंडय़ा 4-0-21-1.

मुंबई इंडियन्स : पार्थिव पटेल झे. गेल, गो. बद्री 3 (8 चेंडू), जोस बटलर झे. गेल, गो. बिन्नी 2 (5 चेंडू), रोहित शर्मा त्रि. गो. बद्री 0 (2 चेंडू), मॅकक्लॅघन झे. मनदीप, गो. बद्री 0 (1 चेंडू), नितीश राणा झे. अरविंद, गो. बद्री 11 (16 चेंडूत 1 चौकार), केरॉन पोलार्ड झे. डिव्हिलियर्स, गो. चहाल 70 (47 चेंडूत 3 चौकार, 5 षटकार), कृणाल पंडय़ा नाबाद 37 (30 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 9 (4 चेंडूत 1 षटकार). अवांतर 13. एकूण 18.5 षटकात 6/145.

गडी बाद होण्याचा क्रम – 1-7 (बटलर), 2-7 (पटेल), 3-7 (मॅकक्लॅघन), 4-7 (रोहित), 5-33 (राणा), 6-126 (पोलार्ड).

गोलंदाजी – सॅम्युएल बदी 4-1-9-4, स्टुअर्ट बिन्नी 2-0-14-1, एस. अरविंद 4-0-21-0, टायमल मिल्स 3.5-0-36-0, यजुवेंद्र चहाल 3-0-31-1, पवन नेगी 2-0-28-0.

Related posts: