|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्तरीत माकडतापाच्या रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली

सत्तरीत माकडतापाच्या रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरीत माकडतापाच्या रुग्णांची संख्या सुमारे 75 वर पोहोचली असून केरी व शिरोली भागात सध्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. तर हिवरे परिसरात माकडांच्या मृत्युचे प्रमाण वाढले आहे. म्हादई अभयारण्याच्या सूत्रांतून मिळालेली माहिती अशी की, मागील तीन महिन्यात मृत्त माकडांची संख्या वाढल्याने खबरदारी बाळगण्याची गरज निर्माण झाली असून वाळपई आरोग्य केंद्राच्या यंत्रणेने लोकांना याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना केली आहे. तसेच लसीकरणाची मोहीम मोठय़ा प्रमाणात सुरू असून आजवर सुमारे नऊ हजारांवर लोकांना लस देण्यात आली आहे. अजूनही ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांनी तत्काळ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

सत्तरीत 80 टक्के गावाना वेढा

तीन वर्षांपूर्वी पाली गावातून माकडतापाच्या रोगाची सुरूवात झाली होती. त्यावेळी सरकारने हा विषय गंभीरतेने हाताळला नाही. त्यानंतर या रोगाने सत्तरी तालुक्यातील सुमारे 80 टक्के गावांना वेढा घातला आणि त्यातून लोकांच्या मृत्युचे प्रमाण वाढू लागल्यावर सरकारने याबाबत माकडताप प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबविली.

शिरोली परिसरात माकडतापाचे 15 हून अधिक रुग्ण

सध्या या रोगाने शिरोली व केरी या भागाकडे कूच केली असून शिरोली परिसरात माकडतापाचे सुमारे 15 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. केरी व शिरोली ही गावे जरी भौगोलिकदृष्टय़ा सत्तरी तालुक्यात येत असली तरी आरोग्य खात्याने ही गावे सांखळी सामाजिक रुग्णालयाशी संलग्नित केली आहेत. सध्या सांखळी आरोग्य केंद्राची यंत्रणा सक्रिय झाली असून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.

हिवरे परिसरात 15 हून अधिक माकडे मृत्त

हिवरे परिसरात आजवर 15 हून अधिक माकडे मृत्त पावली आहेत. यापैकी काही माकडे तर लोकवस्तीपासून थोडय़ाच अंतरावर मृत्त सापडल्याने आरोग्य खात्याने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

लोकांनी मृत्त माकडांची माहिती द्यावीः प्रकाश सालेलकर

याबाबत म्हादई अभयारण्याचे वनाधिकारी प्रकाश सालेलकर यांनी लोकांनी आसपासच्या परिसरातील मृत्त पावलेल्या माकडांबाबत तत्काळ वन खात्याला माहिती दिली पाहिजे. अन्यथा रोगप्रवाहित गोचिडीद्वारे हा रोग झपाटय़ाने फैलाव करु शकतो. त्यामुळे लोकांनी मृत्त माकडांबाबत माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related posts: