|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दलितांवर अन्याय होऊ देणार नाही

दलितांवर अन्याय होऊ देणार नाही 

प्रतिनिधी/ पणजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण समाजापर्यंत जाणे आवश्यक असून त्यांचे गुण सर्वांनी अंगी बाणवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. आपण जनतेमध्ये कोणताही भेदभाव करणार नसून दलितांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील. अन्याय झालाच तर माझ्याकडे या किंवा पत्र पाठवा, असेही ते म्हणाले.

पणजीत काल शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या राज्यस्तरीय सोहळ्य़ात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. पणजी बसस्थानकाजवळील डॉ. आंबेडकर उद्यानात हा कार्यक्रम झाला. श्री. पर्रीकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, दिल्लीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. आंबेडकरांना खूप मानतात याचे दर्शन घडले. डॉ. आंबेडकरांचे घर (महू) मध्यप्रदेशात असून ते त्यांच्या जन्मावेळी लष्कराच्या ताब्यात होते. ते खुले करण्याची परवानगी इतक्या वर्षानंतर अलिकडेच आपण दिली, असे पर्रीकरांनी सांगितले. काश्मिरचा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन मुदतीचे धोरण आवश्यक आहे. तो लगेच सुटणारा प्रश्न नाही, असे मत श्री. पर्रीकर यांनी मांडले.

तत्पूर्वी त्यांच्या हस्ते सर्वश्री विठ्ठल बांदेकर, प्रकाश परवार, जयवंत हळर्णकर, खुशाली परवार, लोकेश्वर निपाणीकर यांना दलित मित्र पुरस्कार देण्यात आला. रु. 25 हजार, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

बाबासाहेबांना देशाची चिंता होती : पतंगे

प्रमुख वक्ते रमेश पतंगे म्हणाले की, झापलेल्या समाजाला जागे करण्यासाठी डॉ. आंबेडकर नेहमी जागे राहत असत. त्यांनी नेहमीच अहिंसक मर्गाने लढा दिला आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवून दिले. राजकीय स्वातंत्र्य मिळवले म्हणून स्वातंत्र्य सैनिकांना किंमत मिळते, परंतु सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणाऱयांना फारशी किंमत मिळत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तिन्ही क्षेत्रात डॉ. आंबेडकरांनी क्रांति केली आणि सर्वांना समान संधी बहाल केली. शेतीला उद्योगाची जोड देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांना देशाची चिंता होती, असे पतंगे यांनी नमूद केले. 370 कलमामुळेच काश्मिरचा प्रश्न निर्माण झाला असून काश्मीर वाचवण्यात डॉ. आंबेडकर यांचे मोठे योगदान असल्याचे पतंगे म्हणाले.

दलितांच्यामागे उभा राहणार : आजगांवकर

दलितांचे प्रश्न घेऊन आपण पुढे जाणार असून त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहाणार असल्याचे निवेदन पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी केले. पेडणे मतदारसंघ गोव्यात ‘नंबर वन’ करण्याचे ध्येय असून दलितांवर अन्याय होणार नाही. याची काळजी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच देशाने – गोव्याने प्रगती केली असून आपण आमदार, मंत्री बनलो. त्यांचेच आदर्श विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे आजगांवकर यानी नमूद केले.

सभापती डॉ. प्रमोद सावंत यांचेही यावेळी भाषण झाले. व्यासपीठावर मुख्य सचिव धर्मेंद शर्मा, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर, समाजकल्याण खाते सचिव संजय गोयल, संचालक एस. व्ही. नाईक, अनुसूचित जाती – मागासवर्ग महामंडळ व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बरड यांची उपस्थिती होती. डॉ. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. बरड यांनी शेवटी आभार मानले. श्री. गोयल यांनी स्वागत केले. कला अकादमीच्या पथकाने स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली तर शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related posts: