|Monday, August 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » कॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर

कॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर 

जॉय कलामंच च्या माध्यमातून निर्माती जॉय भोसले यांची आणखी एक नाटय़कलाकृती रंगमंचावर येत आहे. एकाच वर्षाच्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मित केलेलं हे तिसरं नाटक आहे. यापूर्वी कळत नकळत आणि नुकतंच प्रदर्शित झालेलं पाऊले चालती पंढरीची वाट हे दोन वेगळे विषय जॉय भोसलेंनी रंगमंचावर सादर केले होते. आणि आता क्विन मेकरच्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील आणखी एक वेगळा विषय रंगमंचावर सादर केला जाणार आहे. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग 17 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे, 18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता गडकरी, ठाणे तर 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे.

प्रसिद्ध अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक आणि प्रकाश संयोजक म्हणून ख्याती प्राप्त असलेले राजन ताम्हाणे यांनी जॉय कलामंच निर्मित ‘क्विन मेकर’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. आजतागायत तब्बल 37 व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शन, 100 हून अधिक नाटकांचे प्रकाशयोजनाकार आणि स्वत: एक कसलेले अभिनेते असलेले राजन ताम्हाणे यांच्याकडून प्रपोजलच्या नेत्रदीपक यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. क्विन मेकरच्या पदार्पणातून त्यांचं कसदार दिग्दर्शन पुन्हा एकदा आपल्याला पहायला मिळणार आहे.

‘क्विन मेकर’ हे नाटक युवा पिढीच्या मूळ प्रश्नाला हात घालणारं आहे. आजची पिढी लग्न करायला तयार झाली तर त्यामध्ये बऱयाच अटी असतात. यामधील काही अटी एकमेकांना पूर्णपणे पटत नसल्या तरी त्यावेळेची गरज म्हणून हा पर्याय ते स्वीकारतात. काळानुसार ही अट बायकोला बदलावीशी वाटते आणि काडीमोड होतो. त्यानंतर तो दुसरं लग्न करतानाही आपली तीच अट कायम ठेवतो. ही अट नेमकी कोणती आणि नाटकात पुढे काय होतं, हे काही दिवसांत नाटक रंगभूमीवर आल्यावरच समजू शकेल. हे नाटक म्हणजे आजच्या कॉर्पोरेट जगतातील पुरुषप्रधान वफत्तीवर बोट ठेवणारा एक आगळावेगळा प्रयोग आहे. या नाटकातील प्रमुख भूमिकांमध्ये अक्षर कोठारी, शीतल क्षीरसागर, अंकिता पनवेलकर, अमित गुहे सोबतच एका खास भूमिकेत बाल कलाकार इलिना शेंडे दिसणार आहेत. अभिनेता अक्षर कोठारी यांचं हे दुसरं व्यावसायिक नाटक आहे. याआधी त्यांनी लग्नबंबाळ हे नाटक तसेच बंध रेशमाचे, आराधना, कमला या मालिकेत भुमिका केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील चाहूल या मालिकेतील त्याची भूमिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री शीतल क्षीरसागर यापूर्वी अनेक चित्रपट दुर्वा आणि का रे दुरावा ही मालिका तसेच तिन्हीसांज नाटकाच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे. तर असं सासर सुरेख बाई फेम अंकिता पनवेलकर एका वेगळय़ा भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या नाटकात काम करणारी चिमुरडी इलिना शेंडे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांची नात आहे. निश्चितच इलिना शेंडे या नाटकाचं खास आकर्षण ठरेल.

क्विन मेकरची कथा लेखक रवि भगवते यांची असून प्रदिप मुळय़े यांचे नेपथ्य लाभले आहे. नाटकाचे संगीत परिक्षित भातखंडे आणि प्रकाशयोजना राजन ताम्हाणे, वेशभूषा कुहू भोसले, रंगभूषा शरद सावंत, व्यवस्थापक ओमकार पनवेलकर तर सूत्रधार गोटय़ा सावंत हे आहेत.