|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डॉ. अजित लवटे नवे भूलतज्ञ

डॉ. अजित लवटे नवे भूलतज्ञ 

प्रतिनिधी / रत्नागिरी

भूलतज्ञ नसल्याने सिव्हीलमध्ये दाखल असलेल्या 16 गर्भवती महिलांना खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागल्याच्या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकाऱयांनी घेतली आहे. गैरहजर असलेले भुलतज्ञ डॉ. केशव गुट्टे यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत देतानाच आपल्या विशेषाधिकारांचा वापर करत दापोलीत कार्यरत असलेल्या डॉ. अजित लवटे यांची नवे भुलतज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे.

सिव्हीलमध्ये गेल्या पाच वर्षांपासून भूलतज्ञाची समस्या भेडसावत आहे. अनेक वेळा नियुक्त्या देऊनही हजर होऊन दिर्घकालीन रजेवर जाण्याचे प्रकार घडत आहेत. अशा अधिकाऱयांवर ठोस कारवाई होत नसल्याने सिव्हीलची समस्या कायम आहे. भूलतज्ञांअभावी अनेक शस्त्रक्रिया रखडल्या असून सिव्हीलमधील रूग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. रविवारी प्रसुतीसाठी दाखल महिलांना भूलतज्ञ नसल्याने बाहेर पाटवण्याची नामुष्की आल्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटला. या ठिकाणी नियुक्त असलेले भूलतज्ञ डॉ. केशव गुट्टे आजारी असल्याने गैरहजर असल्याचे समजते.

दरम्यान, जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी या गंभीर प्रकरणात जातीनीशी लक्ष घातले. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार राजन साळवी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आरसुळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये, डॉ. देवकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी तातडीने या पदावर दापोलीतील डॉ. अजित लवटे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर गैरहजर डॉ. केशव गुट्टे यांच्यावरही कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.