|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरातील नाला बांधकाम मोहिमेला लागला मुहूर्त

शहरातील नाला बांधकाम मोहिमेला लागला मुहूर्त 

प्रतिनिधी  / बेळगाव

शहरातील मध्यवर्ती भागातील नाल्यांमुळे पावसाळय़ात शहरवासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे नाला बांधकामाची कामे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असून बसवेश्वर चौक (गोवावेस) ते मराठा मंदिर मंगलकार्यालयापर्यंत नाल्याच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यावेळी महापौर संज्योत बांदेकर व आमदार संभाजी पाटील यांच्याहस्ते पूजन करण्यात आले.

नाल्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले असून काही ठिकाणी कचरा साचून राहिल्याने मागील पावसाळय़ात ठिकठिकाणाच्या वसाहतांमधील घरांमध्ये नाल्याचे सांडपाणी घुसले होते. काही उपनगरांमधील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येवून संपर्क तुटला होता. यामुळे शहर अभियंते आर. एस. नायक व शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी नाल्यांची पाहणी केली होती.

मराठा मंदिर ते बसवेश्वर चौक (गोवावेस चौक) पर्यंतच्या नाल्याचे बांधकाम करण्यासाठी निधीची तरतूद महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. एसएफसी निधीमधून एक कोटी 20 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नाल्यांवर विविध ठिकाणी बांधकाम करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामे घेण्यात आली आहेत. याअंतर्गत मराठा मंदिर ते बसवेश्वर चौकपर्यंतच्या नाला बांधकामास सोमवारी सुरू करण्यात आले. या कामाचे पूजन महापौर संज्योत बांदेकर, आमदार संभाजी पाटील, माजी महापौर महेश नाईक, नगरसेवक विजय भोसले, माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, साहाय्यक कार्यकारी अभियंते आर. ए. शेट्टर, एस. बी. मुर्तेण्णावर, अग्निशमन दलाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.