|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » टीसीएसकडून 16 हजार कोटीची शेअर्स बायबॅक

टीसीएसकडून 16 हजार कोटीची शेअर्स बायबॅक 

मार्च तिमाही कंपनीच्या उत्पन्न, नफ्यात घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसच्या समभागधारकांनी 16 हजार कोटी रुपयांच्या समभागांची पुनर्खरेदी (बायबॅक) करण्यास मंजुरी दिली. भारतीय भांडवली बाजारातील ही सर्वात मोठी बायबॅक आहे. दिग्गज आयटी कंपनीने आपल्याकडील रोख रक्कम समभागधारांना वाटण्यासाठी हा निर्णय घेतला.

पुनर्खरेदीच्या प्रस्तावाच्या बाजूने 99.81 टक्के मते पडली. फेब्रुवारी महिन्यात टीसीएसच्या व्यवस्थापनाने 16 हजार कोटी रुपयांचे समभाग पुनर्खरेदीला मंजुरी दिली होती. आता कंपनी 2.85 टक्के म्हणजेच 5.61 कोटी समभाग खरेदी करणार आहे. एका समभागाची किंमत 2,850 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. टीसीएसचा 2016-17 च्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी बायबॅकची घोषणा करण्यात आली. देशात यापूर्वी ऐवढय़ा मोठय़ा किमतीचा बायबॅक कधीही झाला नाही. यापूर्वी रिलायन्स इन्डस्ट्रीजने 2009 मध्ये 10,400 कोटी रुपयांच्या समभागांची पुनर्खरेदी केली होती.

नफ्यात 2.5 टक्क्यांनी घसरण

2017 च्या चौथ्या तिमाहीत टीसीएसचा नफा 2.5 टक्क्यांनी घसरत 6,608 कोटी रुपयांवर पोहोचला. यापूर्वीच्या तिमाहीत 6,778 कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 0.3 टक्क्यांनी घसरण होत 29,642 कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या तिमाहीत ही रक्कम 29,735 कोटी रुपये होती. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा एबिडटा 7,733 कोटी रुपयांवरून 7,627 कोटी रुपयांवर पोहोचला.

Related posts: