|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत युवा संघाचा पराभव

भारत युवा संघाचा पराभव 

पहिल्या सराव सामन्यात सेतुबल संघ 2-1 गोल्सनी विजयी

वृत्तसंस्था/ लिस्बन

17 वर्षाखालील भारतीय युवा फुटबॉल संघाला युरोप दौऱयातील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मंगळवारी लिस्बनमधील ट्रॉइया येथे झालेल्या सराव सामन्यात भारताला पोर्तुगालच्या व्हिटोरिया डी सेतुबल संघाकडून 1-2 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला.

जोस मॉरिन्हो टेनिंग सेंटर येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ केला. मात्र दोन्ही संघांना गोल करण्याच्या फार कमी संधी मिळाल्या. सामन्याच्या प्रारंभी भारतीय युवकांनी बॉलपझेशनच्या बाबतीत वर्चस्व गाजविले तरी सेतुबल यू-17 संघाला गोल करण्याची पहिली संधी मिळाली ती 16 व्या मिनिटाला. मात्र त्यांचा फटका भारतीय गोलपोस्टच्या क्रॉसबारला लागून गेल्याने ही संधी वाया गेली. 38 व्या मिनिटाला मात्र सेतुबलला पहिले यश मिळाले. बॉक्स क्षेत्रात भारतीय खेळाडूने अवैध टॅकल केल्याने सेतुबलला पंचांनी पेनल्टी बहाल केली आणि त्यावर बुनो व्हेन्चुराने गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत ही आघाडी त्यांनी कायम ठेवली होती.

उत्तरार्धात भारताने आपले आक्रमण तेज केले आणि बरोबरोसाठी सेतुबलवर दडपण आणले. 47 व्या मिनिटाला बरोबरीची संधीही मिळाली होती. पण अनिकेत जाधवचा फटका बारच्या काही इंचावरून बाहेर गेल्याने ही संधी वाया गेली. पुढच्याच मिनिटाला त्याला आणखी एक संधी मिळाली होती. पण यावेळी त्याचा फटका वाईड गेल्याने ही संधीही वाया गेली. 67 व्या मिनिटाला मात्र भारताला पहिले यश मिळाले. यावेळी अनिकेतने पेनल्टी स्पॉटवर गोल नोंदवत भारताला बरोबरी साधून दिली. भारताने आघाडी घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना सेतुबलचा बचाव भेदता आला नाही. उलट सेतुबलनेच 85 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून भारतावर आघाडी घेतली आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. दुसरा सराव सामना 25 एप्रिल रोजी जेमोर, पोर्तुगाल येथे बेलेनेन्सेस युवा संघाविरुद्ध होणार आहे.

Related posts: